नाशिकरोड(इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक साखर कारखाना सुरू करतांना गतकाळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. हा साखर कारखाना चालविण्याची जबाबदारी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्यांची जितकी आहे तितकीच शासन, लोकप्रतिनिधी, शेतकरी, सभासद आणि कामगार वर्गाची देखील आहे. रोग बरा होण्यासाठी जशी औषधे निश्चित करावी लागतात त्याप्रमाणे नासाका यापूर्वी का बंद झाला याच्या कारणांचा शोध घ्या, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. नासाका नूतनीकरण शुभारंभ शनिवारी गुढीपाडवा मुहूर्तावर त्यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी भुजबळ बोलत होते.
या कार्यक्रमास युवराज छत्रपती शहाजीराजे भोसले, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे, माणिक कोकाटे, हिरामण खोसकर, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे दीपक चंदे, शिवाजी चुंबळे, विष्णुपंत म्हैसधूने, सुनील बागुल, निवृत्ती डावरे, दिनकर आढाव, दशरथ पाटील, नयना घोलप, सुधाकर बडगुजर, राजाराम धनवटे, करण गायकर, जिल्हा बँक प्रशासक अरुण कदम आदींसह कारखाना माजी पदाधिकारी, नासाका कामगार युनियन, नासाका बचाव कृती समिती पदाधिकारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते.
भविष्यात नासाका चालविण्यात कोणतीही अडचण आली तर छत्रपती घराणे आपल्या पाठीशी उभे राहिल अशी ग्वाही युवराज छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी यावेळी दिली. आमदार सरोज आहिरे यांनी नासाका सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. निवडणुकीत जनतेला दिलेले वचन पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. नासाका सुरू करण्याची ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्यांना सहकार्य करा, असे आवाहन बबन घोलप यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले. शेतकरी हितासाठी नासाका सुरू करण्यास पुढाकार घेतला असून यापुढे नासाकाची गाळपक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. प्रास्ताविक माजी चेअरमन तानाजी गायधनी यांनी केले. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते नासाकाचे प्रवेशद्वार उघडण्यात आले.
आमदार माणिक कोकाटे यांची विरोधी भूमिका-
नासाका सुरू करण्यास जर चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असेल तर नासाका सुरू करू नका, नवीन साखर कारखाना सुरू करा, अशी भूमिका आमदार माणिक कोकाटे यांनी घेतल्याने उपस्थितांना आश्चर्य वाटले. बंद साखर कारखाने ज्यांनी चालवायला घेतले ते पुढे चालून अडचणीत कसे आले याचे त्यांनी उदाहरण दिले. नासाका सुरू करण्यासाठी अजून महिनाभर विचार करा, त्यानंतरच निर्णय घ्या, एकदा कारखाना सुरू झाला की तो पुन्हा बंद होता कामा नये, हा कारखाना मध्येच बंद झाल्यास अनेक वर्षे बदनामी सहन करावी लागेल असा इशाराही कोकाटे यांनी दिला. नासाका चालविणे म्हणजे शेजारच्या नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांशी स्पर्धा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.