भगवान नरसिंह जयंती महात्म्य
– पंडित दिनेश पंत
यंदा वैशाख शुद्ध चतुर्दशी अर्थात २५ मे या दिवशी भगवान नरसिंह जयंती साजरी होणार आहे. विष्णूचा चौथा अवतार असलेल्या भगवान नरसिंह यांचे जगभरात लाखो भक्त आहेत. संकट मग ते कोणत्याही प्रकारचे असेल त्याचा फडशा पाडण्याची जिद्द भगवान नरसिंह यांच्या उपासनेतून मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक ठिकाणी नरसिंह जयंतीच्या आधी नरसिंह नवरात्र पाळले जाते. त्यामध्ये नऊ दिवस उपवास करणे, जप, आरती हे नित्यक्रम करून जयंतीच्या दिवशी पारायण समाप्ती करणे, असा नित्यकर्म पाळला जातो.
भगवान नरसिंह अवतार कथा
पौराणिक काळामध्ये राजा हिरण्यकश्यपू हा देवांच्या भक्तीच्या विरोधात होता. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूभक्त होता. प्रल्हादाची ही विष्णू भक्ती थांबवण्यासाठी हिरण्यकश्यपूने विविध उपाय केले होते. परंतु त्याला त्यात यश येत नव्हते. हिरण्यकश्यपू याला ब्रह्मदेवाने अमरत्वाचा वर दिला होता. त्यामध्ये हिरण्यकश्यपूचा मृत्यू हा मनुष्य किंवा श्वापद त्याचप्रमाणे दिवसा अथवा रात्री शस्त्राने अथवा अस्त्राने घरात किंवा बाहेर त्याचप्रमाणे हवेत अथवा पृथ्वीवर असा कुठेही होऊ शकणार नाही, असा वर त्याला प्राप्त होता.
प्रल्हाद याच्या विष्णू भक्तीला आव्हान देण्यासाठी हिरण्यकश्यपूने भगवान विष्णू यांस प्रकट होण्यास सांगितले. त्यावेळी भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाचा असलेला अमरत्वाचा वर लक्षात ठेवून स्वतःचे शरीर मनुष्य अर्थात नराचे तर शिर मात्र सिंहाचे त्याचप्रमाणे दिवसा व रात्री प्रकट न होता सायंकाळी तेही राजवाड्याच्या आत किंवा बाहेर प्रकट न होता उंबर्यावर व शस्त्र किंवा अस्त्रा चा वापर न करता स्वतःच्या नखांनी त्याचप्रमाणे हवेत अथवा पृथ्वीवर न ठेवता स्वतःच्या मांडीवर हिरण्यकश्यपूला ओढून त्याचा वध केला, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.
पूजा साहित्य व विधी
भगवान नृसिंह अवतार हा सायंकाळी प्रकट झालेला असल्याने या दिवशी पूजा देखील सायंकाळीच करतात. लाल वस्त्रावर नृसिंह प्रतिमेचे हार, फुले, अक्षदा, तिलक लावून विधीवत पूजन केले जाते. धूप तसेच नंदादीप लावून रांगोळ्या काढल्या जातात. नरसिंह पारायण वाचन, नरसिंह कवच, नरसिंह स्तोत्र, चालिसा, नरसिंह अवतार कथा, नरसिंह जप अशा विविध प्रकारे अर्चना केली जाते. शेवटी आरती व महानैवेद्य दाखवून भगवान नरसिंह यांचा जयजयकार करून प्रसाद वाटप केले जाते. आपल्या समोरील आव्हानांचा सर्व बाजूने अभ्यासपूर्ण विचार करून आव्हानांना सामोरे गेल्यास यशप्राप्ती निश्चित होते, असे प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे भगवान नरसिंह होय.