नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा अत्यंत यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे, कारण या दौऱ्यातनंतर आगामी काळात अमेरिका विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भारतात गुंतवणूक करणार असल्याने उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे, तसेच भारतात अब्जावधी डॉलर्सचा फायदा होणार आहे. गुगल आणि ॲमेझॉनसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी आगामी काळात भारतात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
व्यापार-तंत्रज्ञानाचे नवे पर्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेची फलनिष्पत्ती म्हणून भारत-अमेरिका व्यापार-तंत्रज्ञान सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. भारतीय वायुदलासाठी जेट इंजिनांची सहनिर्मिती, संरक्षण उद्योगात भागीदारी, अंतराळ क्षेत्रात सहकार्य, सेमिकंडक्टर पुरवठा साखळी आणि संशोधनात भागीदारी, नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भागीदारी आदींबाबतचे करार यावेळी करण्यात आले. मोदी यांचा हा दौरा सुरू असतानाच जीई एअरस्पेसने त्यांच्या हिंदूस्थान एअरोनॉटिक्सबरोबरच्या सामंजस्य कराराची घोषणा केली. त्यानुसार, भारतीय हवाई दलासाठी लढाऊ जेट इंजिन तयार केले जाणार आहेत. या अत्याधुनिक इंजिनांमुळे भारतीय हवाई दलाचे बळ वाढणार आहे. मोदी आणि बायडेन यांनी द्विपक्षीय चर्चेत संरक्षण क्षेत्रातील भागीदारी वाढविण्याचा निर्धार केला. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील आणखी एक यश म्हणजे भारतात अमेरिकन चिप कंपनीही मोठी गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावेळी मायक्रॉन कंपनीने गुंतवणूक आणि प्लांट उभारण्याची मोठी घोषणा केली आहे. मायक्रॉन कंपनीने गुजरातमध्ये २.५अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून कंपनी सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे.
ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्यामुळे भारत-अमेरिका संबंध मजबूत झाले असून आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन भारतात आगामी काळात मोठी गुंतवणूक करणार आहे. ॲमेझॉन कंपनी भारतात एकूण २६ बिलियन डॉलर म्हणजे सुमारे २६०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याआधी ॲमेझॉन कंपनीने भारतात ११ बिलियन डॉलर म्हणजे ११०० कोटींची गुंतवणूक केली आहे. आता कंपनी आणखी १५बिलियन डॉलरची अर्थात भारतीय रुपयांमध्ये १५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
गुगल, टेस्लाचाही निर्णय
टेक क्षेत्रातील प्रसिद्ध गुगल कंपनी ही भारतात १०बिलियन डॉलर म्हणजे १ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीसह, कंपनी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक म्हणजेच गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे गुगलचं जागतिक फिनटेक ऑपरेशन सेंटर उभारण्यात येईल. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. त्याचप्रमाणे टेस्लाचे सीईओ व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनीही पंतप्रधान मोदी यांची भेट घेल्यानंतर भारतात गुंतवणुकीचे संकेत दिले. मस्क यांनी संकेत दिले आहेत की, त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरच भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे.