नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघ्या काही दिवसांत सभेचे फड गाजणार आहे. भाजपने प्रचारासाठी खास रणनिती आखली असून पंतप्रधानांच्या सभेचे आयोजन केले आहे. पंतप्रधानांच्या सभेचा उत्तर महराष्ट्रात नारळ फुटणार असून पहिली सभा नाशिक व धुळे येथे ८ नोव्हेंबरला होणार आहे.
त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, १३ नोव्हेंबरला सोलापूर, कोल्हापूर, १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई येथे या सभा होणार आहे. राज्यातील ही निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे भाजपने पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवर जास्त भर दिला आहे.
राज्यात उमेदवारांच्या नामनिर्देशपत्राची छाननी झाल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी माघारीची शेवटची तारीख आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.









