नवी दिल्ली – अमेरिकेच्या दौर्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची शुक्रवारी (२४ सप्टेंबर) भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या चर्चेदरम्यान पाकिस्तानचाही विषय निघाला. अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या भूमिकेबाबत भारत आणि अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. मोदी आणि बायडेन यांनी द्विपक्षीय बैठकीत अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना करण्याच्या महत्त्वाला अधोरेखित केले. तसेच दहशतवाद्यांना संरक्षण पुरवत असल्याबद्दल दोन्ही देशांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर वॉशिंग्टन येथे श्रृंगला पत्रकारांशी बोलत होते. या वेळी मोदी यांनी बायडेन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत तसेच हिंदी आणि प्रशांत महासागर क्षेत्राबाबत स्थापन करण्यात आलेल्या चतुष्कोणीय फ्रेमवर्क (क्वाड) च्या बैठकीत अफगाणिस्तानातील परिस्थिती, कट्टरवाद, दहशतवाद आणि पाकिस्तानच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार सर्वसमावेशक नसून, त्यामध्ये अल्पसंख्याक आणि महिलांची भागिदारी नाही. मानवाधिकाराशी संबंधित अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे तालिबान सरकारला लोकशाहीवादी मानले जाऊ शकत नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बैठकीदरम्यान मान्य केले.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षपदाबाबत विशेषतः अफगाणिस्तानसंदर्भात उचललेल्या पावलांबाबत अमेरिकेने भारताचे कौतुक केले. सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळणे आवश्यक आहे, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी भारताला पाठिंबा दिला. पंतप्रधानांनी बायडेन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले असून, बायडेन यांनी ते स्वीकारले आहे.
तालिबानने दहशतवाद्यांच्या गटांना आश्रय देणे किंवा त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी तसेच कोणत्याही देशाला धमकी देणे किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करू नये, असे पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तामधील पाकिस्तानच्या भूमिकेकडे खूपच सतर्कतेने पाहण्याची गरज आहे. क्वाड देशांमध्ये याबाबत एकमत आहे, असेही दोघांनी सांगितले.