नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरातच्या मोरबी येथे नदीवरील झुलता पूल कोसळल्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत तब्बल १३४ जणांचा बळी गेला आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. या अपघाताचीही चौकशी सुरू झाली असून आतापर्यंत ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुजरात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे. त्यातच आता ही घटना घडल्याने निवडणुकीपूर्व होणाऱ्या विविध दौऱ्यांनाही लगाम लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो रद्द
या घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की, गुजरातमध्ये उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पटेल आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
राज्य सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अहमदाबादमध्ये होणारा त्यांचा रोड शो रद्द केला आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्ष (भाजप) सूत्रांनी दिली.
अरविंद केजरीवाल यांचाही रोड शो रद्द
आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील आदमपूर येथील आपला रोड शो रद्द केला आहे. आगामी पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते आज म्हणजेच सोमवारी अमदपूर येथे रोड शो करणार होते. येथे ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे हरियाणा संपर्क प्रमुख सुशील गुप्ता यांनी सांगितले की, “गुजरातमधील पूल दुर्घटनेमुळे अरविंद जी यांचा सोमवारी होणारा रोड शो रद्द करण्यात आला आहे.”
Narendra Modi and Arvind Kejriwal Decision Morbi Accident