इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चिमूरः लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने भाजपवर संविधान बदलून आणि वंचितांचे आरक्षण काढून घेतले जाईल, अशी टीका भाजपवर केली होती. आता त्याच टीकेला प्रत्युतर देताना आरक्षणाचे कार्ड मोदी यांनी बाहेर काढले आहे. चिमूर येथील सभेला संबोधित करताना ते म्हणाले, की तुमची एकजूट राहिली नाही, तर काँग्रेस आरक्षण हिसकावून घेईल.
मोदी म्हणाले, ‘तुम्ही एक राहिला नाहीत, तुमची एकजूट तुटली, तर तुमचे आरक्षण हिसकावून घेणारी काँग्रेसच पहिली असेल. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. समृद्धी कायम राहावी यासाठी आपली एकजूट टिकली पाहिजे. या देशातील दहा टक्के लोकसंख्येमध्ये आदिवासी आहेत, तर काँग्रेस त्यांना जातींमध्ये विभागू इच्छित आहे. जेणेकरून ते त्यांना कमकुवत करू शकतील. आदिवासी समाजात फूट पडल्यास हे लोक आपली ओळख नष्ट करतील.’
काँग्रेस आरक्षणामुळे चिडली असून, केवळ देशावर राज्य करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, अशी मानसिकता आपल्या ‘राजघराण्या’ची आहे, अशी टीका करून ते म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना कधीही प्रगती करू दिली नाही. १९८० च्या दशकात राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाने दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना दिलेल्या विशेष अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही जुनी जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. यावरून पक्षाची आरक्षणविरोधी वृत्ती दिसून येते. तुमची एकजूट तुटली पाहिजे, ही काँग्रेसची घातक खेळी आहे.
काँग्रेसच्या राजपुत्रांनी स्वत: परदेशात जाऊन ही घोषणा केली आहे. त्यामुळेच मी म्हणतो, की काँग्रेसच्या या कारस्थानाला आपण बळी पडू नये, आपली एकजूट राहिली पाहिजे. येथील प्रचंड जनसमुदाय हे दर्शविते, की महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच प्रचंड बहुमताने सत्तेत येईल. भाजपचे संकल्पपत्र महाराष्ट्राच्या विकासाची हमी देणार असल्याचे मोदी म्हणाले. काश्मीरमधील कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी रद्द करण्याबाबत मोदी म्हणाले, की देशासाठी एकच राज्यघटना सुनिश्चित करण्यासाठी सात दशके लागली. तुम्ही काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना काश्मीरमध्ये कलम ३७० आणू देणार का?असा सवाल करताना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असल्याचे मोदी म्हणाले.
एकता तुटली तर कोटाच हिसकावून घेतला जाईल, असे आरक्षणाचे कार्ड भाजपने खेळले आहे. महाराष्ट्रातील दलित आणि आदिवासी समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. यापूर्वी हरियाणात भाजपने बाजी मारली असून त्यामागे दलित वर्गाचा पाठिंबा असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत भाजप आता तीच रणनीती महाराष्ट्रात राबवू पाहत आहे.