नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दस्त नोंदणी/दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार व रविवार सुरु ठेवावे आणि दैनंदिन कामकाज २ तास वाढवावे अशी विनंती पत्र नरेडकोने दिले आहे. नरेडकोने पत्रात म्हटले आहे की, नाशिक शहराचा गेल्या काही वर्षात सर्वांगीण विकास होत असून, शहरात बांधकाम व्यवसाय व अनुषंगिक विकासास नवनवीन आयाम प्राप्त होत आहे. याचबरोबर आपल्या विभागाच्या अखत्यारीत असलेल्या खरेदी-विक्री / दस्त नोंदणीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आर्थिक वर्षाचा शेवट व pmay अनुदान योजनेची मुदत माहे मार्च २०२२ पावेतो असल्याने दस्त नोंदणी वाढणार आहे, असे नरेडकोने म्हटले आहे.
नरेडको पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सद्यपरिस्थितीत दस्त नोंदणी कार्यालयात सर्वर डाउन, इतर तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने दस्त नोंदणीस अडचणी निर्माण होत आहे, बहुतेक दस्त नोंदणीसाठी येणारे सामान्य नागरिक / पक्षकार हे बाहेरगावचे असल्याने सर्वर डाउन, तांत्रिक अडचणी यामुळे कुचंबणा व आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात बसत आहे. संबंधित नागरिकांची वेळ आणि ऊर्जा खर्ची पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मुद्रांक शुल्कासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात रांगेत उभे राहिलेल्या ग्राहक वर्गाला सर्व्हर आणि स्कॅनर डाऊन, डाटा एन्ट्री होत नाही या अनाकलनीय बाबी कानी पडत आहेत. या बाबी तांत्रिक असल्या तरी त्यावरील उपाययोजना शोधण्यापेक्षा दरवेळी पुढे करण्यात येणारी कारणांची ढाल ग्राहकांना अस्वस्थ करणारी आहे. परिणामी, आपल्या व्यस्त दिनचर्येतून मुद्रांक शुल्क कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांमध्ये असमाधानाची भावना आहे. आपल्या वरिष्ठ कार्यालय प्रशासनाने या तांत्रिक समस्यांची तड लावणेबाबत तात्काळ पावले उचलावीत व नागरिकांकरिता शनिवार, रविवार अशी कार्यालये सुरु ठेवणेबाबत तसेच संध्याकाळी कामकाजाची वेळ किमान २ तास वाढवावी, अशी मागणी / विनंती पत्रान्वये मा. मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक,नाशिक यांचेकडे करण्यात आली आहे. याबरोबर नाशिक जिल्ह्याकरिता एक स्वतंत्र सर्वर तथा व्यवस्था उभारण्याची कार्यवाही सत्वर करावी अशी विनंती करण्यात आहे.