मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) क्षेत्रीय अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार दणका दिला आहे. देशभरात गाजलेल्या क्रूझ ड्रग पार्टी आणि आर्यन खान प्रकरणाच्या चौकशीतून वानखेडे यांची गच्छंती करण्यात आली आहे. वानखेडे यांच्याकडील तपासाची एकूण ५ प्रकरणे काढून घेण्यात आली आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. अशा प्रकारची एकूण २६ प्रकरणे आहेत. आतापर्यंत केवळ ५ प्रकरणेच वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. एनसीबीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी अजून बरेच काही होणे बाकी असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
आर्यन खानच्या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी झाल्याचा आरोप आहे. तसेच, वानखेडे यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचे असंख्य आरोप मलिक यांनी केले आहेत. यासंदर्भात मलिक यांनी एनसीबीकडे तक्रार केली आहे. तसेच, काही पुरावेही दिले आहेत. याप्रकरणी एनसीबीने चौकशी समिती नेमली आहे. ही चौकशी सध्या सुरू आहे. वानखेडे यांची अनेक तास चौकशी करण्यात आली आहे. आता एनसीबीने वानखेडे यांच्यावर कारवाई सुरू केल्याचे बोलले जात आहे. तसेच, क्रूझ ड्रग पार्टी आणि आर्यन खान प्रकरणाची चौकशी दिल्ली एनसीबीचे पथक करणार असल्याचे एनसीबीने जाहीर केले आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1456620443343855630