मुंबई – इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अर्थातच भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांचा ३१ डिसेंबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच अंमली पदार्थ नियंत्रण विभागातील कार्यकाल संपणार आहे. त्यांना विभागात मुदतवाढ नकोय, अशी माहिती एनसीबीने दिली. २००८ च्या बॅचमधील भारतीय महसूल सेवेचे अधिकारी वानखेडे सप्टेंबर २०२० पासून एनसीबीमध्ये प्रतिनियुक्तीवर आले होते. सध्या ते अंमली पदार्थविरोधी संस्थेचे मुंबई विभागाचे संचालक आहे. आधी ते डायरक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटिलिजन्स म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयात तैनात होते. त्यांचा कार्यकाल खूपच वादग्रस्त राहिला आहे.
वानखेडे यांच्या कार्यकालातील कारवाई
एनसीबीचे विभागीय संचालक यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अंमली पदार्थ बाळगणार्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यामध्ये कथितरित्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. या वर्षी ऑक्टोबरमध्ये वानेखेडे यांच्या पथकाने मुंबईच्या किनार्यावर एका क्रूझवर छापेमारी केली होती. त्यादरम्यान त्यांनी कथितरित्या अंमली पदार्थ जप्त केले होते. याकारवाईदरम्यान त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला इतरांसह अटक केली होती. परंतु छापेमारी दरम्यानचच्या स्वतंत्र साक्षीदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एनसीबीच्या अधिकार्यांनी शाहरूख खानकडून पैसे वसूल केल्याचा आरोपही नंतर करण्यात आला होता.
नवाब मलिक आणि वानखेडे आमनेसामने
राज्याचे मत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात संघर्ष सुरू झाला. समीर वानखेडे मुस्लिम असून, त्यांनी बनावट जातप्रमाणपत्र मिळवून अनुसूचित जातीच्या कोट्यामधून नोकरी मिळविल्याचा आरोप मलिक यांनी केला. वानखेडे यांनी मलिकांचे आरोप फेटाळून लावले. वानखेडे यांच्या वडिलांनी मलिक यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. वानखेडे यांना एनसीबीनंतर कुठे तैनात करण्यात येणार आहे, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.