इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आता ठाकरे बंधु विजयी मेळावा घेणार असून त्याचे ठिकाणही आता ठरले आहे. हा मेळावा ५ जुलै रोजी मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित रोहणार आहे. या मेळाव्याची जोरदार आणि जय्यत तयारी सुरु झाली आहे.
यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत.
सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती !