मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर राणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मी कोणताही गुन्हा केलेला नाही असे सांगत त्यांनी माझे वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचे वक्तव्य नसल्याचेही राणे यांनी सांगितले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही. मी ऐकीव माहितीवर बोलणार नाही. जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असे वक्तव्य केले होते. त्या विधानावर गुन्हा का दाखल झाला नाही असा प्रतिसवालही त्यांनी केला. यावेळी राणे यांनी आमचेही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात असा इशाराही दिला. यावेळी गुन्हा दाखल झाल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नांवर राणे म्हणाले की, काय नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला ? कोण बडगुजर मी ओळखत नाही. माध्यमांनी जर माझी बदनामी करायला घेतली, तर माझ्याकडून माध्यमांवर गुन्हा दाखल केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
राज्यभर शिवसेना आक्रमक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर शिवसेना आक्रमक झाली आहे. चिपळूण येथे शिवसेना – भाजपचे कार्यकर्ते जन आशिर्वाद निमित्त आमने – सामने आले. तर मुंबई, औरंगाबाद सह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. तर भाजपचे कार्यकर्ते काही ठिकाणी विरोध करत आहे. राणे यांच्या विरोधात नाशिकला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिस आयुक्तांनी दिले आहे. तर राज्यभर पोलिस स्थानकात शिवसैनिक तक्रारी दाखल करत आहे.