नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नाशिकला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिस आयुक्तांनी दिले आहे. त्यासाठी उपआयुक्तांची नेमणूक केली आहे. शिवसेना महानगरप्रमख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरुन नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ ऑगस्टला रायगड जिल्ह्यातील महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांच्या विरोधात व्देषभाव, बदनामीकारण करणारी विधाने करुन शत्रुत्वाची व व्देषाची भावना निर्माण होईल असे विधान राणे यांनी केले. या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे हे आहे आदेश
गुन्ह्याची गंभीरता, व्यापकता लक्षात घेता नारायण राणे यांना तात्काळ अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस उप-आयुक्त दर्जा अधिकार नेमणे उपयुक्त असल्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकंडु यांना नारायण राणेंना अटक करण्यासाठी नेमले आहे. तसेच त्यांना एक पोलिसांचे पथक तयार करून नारायण राणेंना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.
अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रतींना द्यावी
तसेच आदेशात पुढे म्हटले आहे की, गुन्ह्यातील आरोपी हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे संसदेच *Rules Of Procedure And Conduct Of Business चे Rule 222 A प्रमाणे* चेअरमन आणि उपराष्ट्रपती यांना कळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकुंडे यांनी नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रपतींना कळवावी. तसेच याशिवाय इंन्टेलीजन्स ब्युरो, भारत सरकार, एसआयडी कमिशनर, महाराष्ट्र शासन व संबंधीत जिल्हा दंडाधिकारी व न्यायदंडाधिकारी यांना नारायण राणे यांच्या अटकेची माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे.