इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ब्रिटनच्या राजकीय वर्तुळाबरोबरच तेथील सर्वसामान्य नागरिकांमध्येही एका विषयाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. ती म्हणजे, भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान होणार. तसे झाल्यास ब्रिटनला पहिला हिंदू पंतप्रधान मिळणार आहे. विशेष म्हणजे सुनक हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
सुनक हे सध्या यूकेचे अर्थमंत्री आहेत. त्यांचे वय ४१ वर्षे आहे. २०१५मध्ये ते कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आणि तेव्हापासून ब्रिटनच्या आर्थिक धोरणांमध्ये त्यांचे प्रभावी काम दिसून आले. २०१९मध्ये त्यांना अर्थखात्यात चीफ सेक्रेटरी म्हणून नेमलं गेलं. ऋषी सुनक यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निवडणूक प्रचारातही मोठी भूमिका बजावली होती. अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि राजकारण या विषयात ऑक्सफर्ड पदवीधर, सुनक हे एक विपुल वक्ते आहेत. त्यामुळे अनेक वेळा निवडणूक प्रचारादरम्यान जॉन्सनच्या जागी सुनकने टीव्ही डिबेटमध्ये भाग घेतला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने अनेकदा त्यांना मीडियाच्या मुलाखतींसाठी पाठवले आहे.
राजकारणात आल्याच्या अवघ्या पाच वर्षात बोरिस जॉन्सन यांनी त्यांना चॅन्सलर बनवले. असे असूनही, ब्रिटीश लोक सुनकला फारसे ओळखत नव्हते. पण गेल्या दोन वर्षात ऋषी ब्रिटनच्या तरुणांमध्ये इतके लोकप्रिय झाले की इथला तरुण ऋषी यांच्याकडे ब्रिटनच्या राजकारणातील उगवता तारा म्हणून बघत आहे. कोरोना महामारीच्या काळात ब्रिटनवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. त्यातून बाहेर काढण्यासाठी ऋषी सुनक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच ते लोकप्रिय झाले. सुनक यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच ब्रेक्झिटला जोरदार पाठिंबा दिला आहे आणि पक्षात त्यांचे स्थान मजबूत केले आहे.
नारायण मूर्तींचे जावई
ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता हिचे पती आहेत. म्हणजेच मूर्तींचे जावई आहे. २००९मध्ये ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांचा विवाहसोहळा पार पडला होता.