नाशिक – महाराष्ट्राच्या भूमीवर पडणारा पावसाच्या प्रत्येक थेंबावर महाराष्ट्राचा हक्क आहे. त्यामुळे आज आपण वापरात नाही म्हणून गुजरातला ह्या पाण्याचा कायमस्वरूपी हक्क जलकराराद्वारे देण्यात येऊ नये. हे पाणी उचलून उत्तर महाराष्ट्रात वळविण्यासाठी कितीही खर्च आला तरी तो करण्याची तयारी दाखवली पाहिजे. मांजरपाडा-१ चे स्वप्न मी दहा वर्षापूर्वी बघितले होते. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा वर्ष अथक प्रयत्न करावे लागले. या वर्षी पावसाळ्यात ह्या प्रकल्पाद्वारे दिंडोरी-चांदवड-येवला व त्यापुढील तालुक्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे नार-पार चे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य आहे. हे मांजरपाडा प्रकल्पाद्वारे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मांजरपाडा-१ ह्या प्रकल्पाकडे पथदर्शी प्रकल्प म्हणून बघितले पाहिजे. अशा प्रकारे सह्याद्रीच्या डोंगररांगेत अनेक ठिकाणी बोगदे करून समुद्राला वाया जाणारे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणणे शक्य आहे. मात्र हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एक ध्यास घेऊन सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र जलपरिषद मार्फत ऑनलाईन १४ ते १७ मे अशी चार दिवशीय वर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये तिसऱ्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, जलतज्ञ इंजि.राजेंद्र जाधव, जलअभ्यासक सुरेश पाटील, भिला पाटील आदींनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी विस्तृत विवेचन केले.यावेळी जलतज्ञ इंजि.राजेंद्र जाधव यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, नर्मदा-तापी खोऱ्यात महाराष्ट्रावर गुजरातने अन्याय करून कमी पाणी दिले आहे. महाराष्ट्राची भोगोलिक परिस्थिती विचित्र आहे. सातपुडापर्वत रांगेच्या उत्तर बाजूने नर्मदा वाहत असल्याने ते पाणी आपण वापरू शकत नाही. तसेच तापी नदी महाराष्ट्रात खालच्या लेव्हलला वाहते. तर तिच्या उपनद्या गिरणा-पांझरा-बोरी-बुराई उंचावरून वाहतात. त्यामुळे तापीच्या पाण्याचा उपयोग महाराष्ट्राला करावयाचा झाल्यास ते पाणी उकाई धरणातून लिफ्ट करून गिरणा-पांझरा-बोरी-बुराई या नद्यांमध्ये टाकावे लागेल. सबब उकाई धरणातून ५० टीएमसी पाणी लिफ्ट करण्याची मागणी केंद्र सरकार व गुजरात सरकारकडे केली पाहिजे असे म्हणाले.
महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता एकूण पावसाच्या ५०% पाऊस कोकणात पडतो व सर्व पाणी गुजरातकडे व समुद्राला वाहून जाते. त्यामुळे कोकणातील दमणगंगा-नार-पार-उल्हास-वैतरणा इत्यादी नदी खोऱ्यांचे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविणे आवश्यक आहे. या दृष्टीने ते स्वतः गेल्या बारा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्राची आजची सिंचन क्षमता फक्त २३% असून देशात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील दीडशे तालुके हे कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. देशात सगळ्यात जास्त धरणे बांधून सुद्धा आपण महाराष्ट्राचा दुष्काळ दूर करू शकलेलो नाही. याउलट गुजरातने केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीने २८० टीएमसी चे उकाई धरण व ३३५ टीएमसी चे सरदार धरण बांधून पूर्ण केले. त्यामुळे गुजरातची सिंचन क्षमता ५५% झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, याव्यतिरिक्त दक्षिणेकडील दमणगंगा-नार-पार-पूर्णा-तापी-नर्मदेचे पाणी खंबाटच्या खाडीत नेऊन तिथे समुद्रात ३० किमी ची भिंत बांधून ३७० टीएमसी क्षमतेचे धरण बांधायचे, त्याच्या बाजूला चीन मधील शांघाय शहराच्या धरतीवर धोलेरा नावाचे जागतिक दर्जाचे शहर उभारायचे व संपूर्ण भारताचा व्यापार ह्या भागात केंद्रित करायचा असे गुजरात सरकारचे नियोजन झालेले आहे. हे महाराष्ट्रासाठी पथदर्शी व अनुकरणीय आहे. ह्याच प्रमाणे महाराष्ट्राने विकासाचा रोडमॅप तयार करणे आवश्यक आहे. “महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला जलकराराद्वारे देण्यात येऊ नये यासाठी जलचिंतन संस्थेमार्फत चार वेळा उपोषणे केली, जनजागृती केली. सर्व लोकप्रतिनिधींना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मग मा.भुजबळ साहेबांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे मागच्या सरकारला गुजरात बरोबर करार करण्यापासून आम्ही रोखू शकलो. मात्र आता दमणगंगा-नार-पारचे पाणी उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात पोहचवण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. पाणी हे जीवन असून सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी, शेतीसाठी, पिण्यासाठी, उद्योगासाठी जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे बुलेट ट्रेन/समृद्धी महामार्ग या प्रकल्पासाठी केंद्रसरकारने कमी व्याजदराने पैसा उभारला आहे, त्याच पद्धतीने नदीजोड साठी स्वतंत्र जलविकास महामंडळ तयार करून कमी व्याजदराने पैसे उभारून कमी दिवसात नदीजोड प्रकल्प उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दहा वर्षापासून छगन भुजबळ, दादा भुसे, खा.हेमंत गोडसे, विधानसभा अध्यक्ष झिरवळ साहेब, माजी आमदार जयंत जाधव व जलचिंतन संस्था यांच्या सामुहिक पाठपुराव्यामुळे पाच नदीजोड प्रकल्पांचे अहवाल तयार झालेले आहेत. त्यामध्ये नार-पार गिरणा लिंक-१२.५ टीएमसी, पार-कादवा लिंक- ३.५ टीएमसी, दमणगंगा-एकदरे लिंक-५ टीएमसी, गारगाई-वैतरणा-कळवा-देवलिंक-०७ टीएमसी, दमणगंगा-पिंजाळ लिंक-३१ टीएमसी, वैतरणा-गोदावरी लिंक-११ टीएमसी असे एकूण ७० टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात वळविण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी निधी आवश्यक असून त्यादृष्टीने सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रस्तावित केले. एन.एम.भामरे सर यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष बापू साहेब घाटकर यांनी कॅबीनेट दर्जाची जलतज्ञांची तांत्रिक समिती तयार करावी व त्याचे अध्यक्ष पद इंजि.राजेंद्र जाधव यांना द्यावे अशी सूचना केली. तसेच महाराष्ट्राचे हक्काचे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली.