नाशिक – शहरातील पाच गुन्हेगारांना पोलिसांनी हद्दपारीसाठी कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे महानगरपालिकेत नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांचे धाबे दणाणले आहे. या पाच जणांमध्ये काही जण मनपा निवडणुकीची तयारी करीत आहेत. या पाचही जणांना त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. बुधवारी (ता.९) सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या जुन्या पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात बाजू मांडण्यासाठी या नोटीसा बजावल्या आहेत.
दोन वर्षासाठी हद्दपारीची ही कारणे दाखवा नोटीस दीपक निवृत्ती दातीर (वय ३१, नवनाथनगर दातीर मळा अंबड), योगेश उर्फ बाळा नामदेव दराडे (वय ३३, संकटमोचन बंगला, आश्विननगर सिडको), किशोर बालाजी साळवे (वय २४, नवनाथनगर, अंबड), योगेश रामकृष्ण चुंबळे (वय ३४, गौळाणे ता.नाशिक), आणि नितीन चंद्रभान सामोरे (वय ३५, स्वामीनगर अंबड) यांना बजावण्यात आली आहे. यात दोन वर्षासाठी हद्दपार का करु नये ? अशी विचारणा करण्यात आली आहे. पोलिस परिमंडल विभाग एकच्या सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांनी या पाच संशयितांना हद्दपारीच्या अनुषंगाने या नोटीस बजावल्या आहे.