विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आपला भारत देश कृषिप्रधान असल्याने शेती क्षेत्रासंबंधी विविध प्रकारचे संशोधन अत्यंत मोलाचे ठरत असते. त्या संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी भरघोस आणि जादा उत्पन्न घेतल्याने देशाच्या विकासात मोलाची भर पडते. असेच जगात प्रथमच एक नवीन संशोधन समोर आले आहे. नॅनो यूरिया प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीतील पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. सहकारी क्षेत्रातील कंपनी इफ्कोच्या आधुनिक शोधामुळे हे शक्य होणार आहे.
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) च्या सर्वसाधारण सभेत नवीन संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संशोधकांनी सांगितले की, जगभरातील शेतकऱ्यासाठी हे आपल्या प्रकारचे पहिले लिक्विड युरिया आहे. इफ्को कंपनीचे बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर हे मातीची पोषक क्षमता राखण्यासाठी या प्रकारचा यूरिया तयार करण्यासाठी संशोधनासाठी कार्यरत आहे. यूरियाची हा नवा प्रकार स्वावलंबी शेतीच्या दिशेने अर्थपूर्ण पाऊल आहे. साधारणतः ५० किलो यूरियाच्या गोणीऐवजी नॅनो यूरिया हा अर्धा लिटर द्रव्य स्वरूपात असून तो योग्य प्रमाणात पुरेल. तसेच किफायतशीर असण्याव्यतिरिक्त ते पिकांसाठीही प्रभावी ठरेल. हा नॅनो लिक्विड यूरिया गुजरातमधील कलोल येथे असलेल्या इफ्को नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये विकसित केला आहे.
या संशोधनामुळे यातील पोषक घटक हे माती, पाणी आणि वायू प्रदूषण कमी करण्यास सक्षम होतील, त्याशिवाय ग्लोबल वार्मिंग कमी करण्यात खूप फायदा होईल. तसेच कोणत्याही परिस्थितीत, पीक वाढीसाठी त्याचा विपरित होणार नाही. या उलट नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकांचे उत्पादन आठ टक्क्यांनी वाढेल असा इफ्कोने दावा केला आहे. पिकांच्या आणि उत्पन्नाच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याने शेतीमालाला योग्य किंमत मिळण्यास मदत होईल.
नॅनो यूरियाचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे ते पिके मजबूत आणि निरोगी बनवते. तसेच उभे पिके शेतात आडवे पडण्यापासून वाचवते. नॅनो यूरिया द्रव लहान आकारामुळे ते घोटी पिशवी किंवा खिशातही ठेवता येते. त्याची वाहतूक आणि साठवण खर्चही लक्षणीय कमी होईल. देशभरात पिकांवर नुकत्याच झालेल्या नॅनो युरीया चाचण्यांमध्ये पिकांच्या उत्पादनात सरासरी ८ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. इफ्को नॅनो यूरियाचे उत्पादन याच महिन्यात म्हणजे जून २०२१ मध्ये सुरू होऊन लवकरच बाजारात ते उपलब्ध होईल.