नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहाद्यात घोड्यांमध्ये ग्लैंडर्स (Glanders) या साथ रोगाचे निष्कर्ष होकारार्थी आल्याने तसेच या रोगाचा प्रसार तालुक्यात किंवा जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेता. जिल्हाधिकारी तथा अध्यक्षा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनिषा खत्री यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार वरील सर्व तालुक्यांत संसर्गकेद्रापासून (Epicentre) 5 कि.मी. बाधित क्षेत्र (Infected Zone) म्हणून घोषीत केले आहे.
त्यामुळे बाधीत क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून 5 कि.मी. परिघातील परिसरात घोडे व तत्सम खरेदी, विक्री, वाहतूक बाजार व जत्रा / प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. रोग प्रादुर्भाव भागातील घोडे व तत्सम, बाजार, यात्रा, पशु प्रदर्शने इ. वर बंदी आणण्याच्या दृष्टीने वरील 5 कि.मी. परिघातील परिसरात गावातील अवागमन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार आणि सहाय्यक आयुक्त पशुसवंर्धन तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय शहादा यांनी ग्लैंडर्स नियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर करून योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी दिल्या आहेत.
शहादा तालुक्यातील भादे, डोंगरगांव, होळ, कुकडेल, लांबोळा, लोणखेडा, मलोनी, मनरद, मोहिदे त.श., मोहिदे त.ह., पिंगाणे, पुरुषोत्तमनगर, सावळदे, शहादा शहर, शिरुड दिगर, टेंभली, तिखोरे व ऊंटावद ही 5 कि.मी. परिघातील बाधित गांवे असून या गावांमध्ये 8 घोडे व 6 गाढवे असे पशुधन आहे.
बाधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना
बाधित जनावरास दयामरण/युथॅनासिया देण्यासाठी योग्य कार्यवाही करावी.
मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फुट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी तसेच मृतदेहाच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
बाधित जनावराच्या संपर्कात आलेल्या जनावरांचे विलिगीकरण करणे बंधनकारक राहील. निरोगी जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत.
एसओपी नुसार बाधित क्षेत्राच्या केंद्र बिंदू पासून 5 कि.मी. त्रिज्येतील सर्व घोडे व तत्सम जनावरांचे सर्वेक्षण करून 3 आठवड्याच्या आत रोग नमुने घेऊन एनआरसीइ संस्थेस पाठवावेत. ही कार्यवाही पुनश्च पढील दोन महिन्यात दोनवेळा 21 ते 30 दिवसाच्या अंतराने करावी.
बाधित क्षेत्राच्या केंद्र बिंदू पासून 5 ते 25 कि.मी. त्रिज्येतील निगराणी ( Surveillance zone) क्षेत्रातील 25 टक्के घोडे व तत्सम जनावरांचे सर्वेक्षण करून रोग नमुने घेऊन एनआरसीइ संस्थेस पाठवावेत. ही कार्यवाही पुढील तीन महिन्यात दोन वेळा करावी.
बाधित क्षेत्राच्या केंद्र बिंदू पासून 25 कि.मी. बाहेरील क्षेत्रात आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पाहणी/ रोग सर्वेक्षण करावे.
साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवांचा निरोगी भागात प्रवेश टाळावा तसेच तबेल्यास त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
प्रादुर्भावग्रस्त भागातील जनावरांची व जनावरांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालीवर बंधन आणणे तसेच प्रादुर्भावग्रस्त भागातील 10 कि.मी. परिघातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशु प्रदर्शने इ. वर बंदी आणण्याच्या दृष्टीने कार्यालयास त्वरीत कळविण्यात यावे.
बाधित परिसरात स्वच्छता करावी व आवश्यक जैवसुरक्षेसह 500 पीपीएम सोडियम हायपोक्लोराईट, 70 टक्के इथेनॉल, 2 टक्के ग्लुटॅरॅलडिहाइड, आयोडिन, बेंझल्कोनियम क्लोराइड (1/2000), मरक्युरिक क्लोराइड इन अल्कोहोल, पोटॅशियम परमैंगनेट व्दारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
बाधित क्षेत्रात व इतर सर्व ठिकाणी या आजाराबाबत पशुपालकांना विविध माध्यमांद्वारे माहिती द्यावी.
प्रादुर्भावग्रस्त गावात/फार्मवर संबंधीत पशुवैद्यकिय संस्थाप्रमुखांनी प्रादुर्भाव संपूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत नियमित भेट देणे अनिवार्य आहे. याप्रसंगी भेट देणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांनी इतरत्र रोगप्रसार होणार नाही याची गंभीरतेने दक्षता घ्यावी.
Nandurbar Shahada Glanders Horse Infection Disease