नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेक पोस्ट मार्गे गुजरात राज्यात वाहन जाऊ देण्यासाठी ४ हजाराची लाच घेणे नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या दोन अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. मोटर वाहन निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे आणि सहाय्यक रोखपाल वेलजी नहाडिया मावची अशी या लाचखोरांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये प्रत्येकी १ वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, कलम १३ (ड) अन्वये प्रत्येकी २ वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणात घडलेली माहिती अशी की, लाच घेणारे दोघे अधिकारी २४ फेब्रुवारी २०१२ रोजी गव्हाली चेक पोस्ट तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे कर्तव्यावर होते. यावेळी मूळ तक्रारदार कंटेनर/ ट्रक चालक हे पुणे येथून त्यांच्या कंटेनरमध्ये माल भरून गुजरात राज्यात जात होते. दिनांक २४ फेब्रुवारी २०१२ रोजी मूळ तक्रारदार हे गव्हाली चेक पोस्ट तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे आले. त्याचवेळी झोडगे आणि मावची यांनी मूळ तक्रारदार कंटेनर /ट्रक चालक यांच्याकडून त्यांची गाडी गव्हाली चेक पोस्ट मार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी ४ हजार रुपये लाच एन्ट्रीच्या स्वरूपात मागणी केली. ४ हजार रुपये लाच पंचां समक्ष स्वीकारले.
याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस स्टेशन गुरनं ३००३/२०१२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१२,१३(१) (ई) (ड), १३(२) अन्वये गुन्हा दाखल होता. नमूद गुन्हयाच्या तपासा अंती मा. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शहादा यांच्या न्यायालयात स्पेशल केस क्रमांक १२/२०१४ अन्वये खटल्याचे कामकाज चालून वरील प्रमाणे दोषसिध्दी मिळाली आहे.
Nandurbar RTO Bribe Officer Court Order