विशेष प्रतिनिधी, नंदूरबार/धुळे
श्रीमंत तरुणांना फसवून त्यांच्याशी लग्न करायचे आणि मधुचंद्राच्या रात्री पैसा व दागिणे घेऊन पसार व्हायचे असे कॅरेक्टर असलेला सोनम कपूरचा ‘डॉली की डोली‘ हा सिनेमा काही वर्षांपूर्वी आला होता. अर्थात अश्या काही घटना प्रत्यक्षात घडल्या होत्या म्हणूनच सिनेमाची कल्पना सूचली होती. त्यानंतर मात्र सिनेमा बघून अनेकांना ही कल्पना सूचली असावी असे म्हणायला हरकत नाही. याची प्रचिती देणारी घटना अलीकडेच खान्देशात घडली.
नंदूरबार येथे पोलिसांनी सोनू नावाच्या तरुणीला अटक केली. या सोनूने तब्बल १३ मुलांना फसवले आणि त्यांच्याशी लग्न केले. नंतर डॉलीच्या स्टाईलमध्ये लुटपाट करून पळून जायची. अगदी चित्रपटाची कॉपी वाटावी अशी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे इथे डॉलीप्रमाणे सोनूसोबतच पाच लोकांची टोळी होती आणि ते सारे नातेवाईक म्हणून सोबत असायचे. तर नेमके प्रकरण जाणून घेऊया.
सोनू शिंदे ही टोळी खरेतर हिंगोली आणि अकोला भागातील असल्याचे सांगितले जाते. वेगवेगळ्या शहरांमधील श्रीमंत तरुणांना फसविण्यासाठी व त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी ही टोळी त्या त्या शहरांमधील दलालांची मदत घ्यायची. प्रत्येकवेळी ते यशस्वी झाले. यंदा नंदूरबारमध्ये मात्र त्यांचा डाव फसला. या टोळीने नंदूरबारमध्ये एका कुटुंबाला फसवले. त्यासाठी औरंगाबादमधील एका दलालाची मदत घेतली.
नंदूरबारमधील शहादा तालुक्यातील मंदाने गावात एका तरुणासोबत सोनूचे लग्न झाले. नवरदेव जाम खूश होता. खरे तर नवरदेवाकडून हुंड्याची मागणी होताना आपण बघतो. इथे सोनूच्या बनावट कुटुंबाने काही लाखांची मागणी केली आणि ती नवरदेवाच्या कुटुंबीयांनी पूर्णही केली. हे सारे घडत असताना कुणाच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली नाही. पाहिजे तेच झाले. सोनू पळून गेली आणि नवरदेवासह त्याचे संपूर्ण कुटुंब आर्थिक फसवणूक झाल्याने गोंधळून गेले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आणि तपास सुरू झाला.
१३ वे लग्न होणारच होते
पोलीस तपास सुरू असताना शिंदखेडा तालुक्यात सोनू तेरावे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे कळले. पण सोनू आणि तिचे साथीदार मोठे हुशार. त्यांना अंदाज आला आणि लग्नाचे स्थळच बदलून टाकले. अमळनेर तालुक्यात एका छोट्याशा गावात लग्न करायचे ठरले. पण पोलिसांनी सोनूला मांडवातच गाठले. सोनू आणि तिच्या टोळीला अटक केल्यामुळे एका नव्हे अनेक नवरदेवांची लूट होण्यापासून टळू शकली. या संपूर्ण स्टोरीमध्ये सोनूच्या आईची आणि भावाची भूमिका पार पाडणारे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले.