नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ॲपलचे मोबाईल किंवा लॅपटॉप हॅक केले जाऊ शकत नसल्याचा कंपनीचा पूर्वापार दावा राहिला आहे. पण, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुत्यातील खापर गावात राहणाऱ्या तरुणाने ॲपलच्या लॅपटॉपमधून डेटा चोरला जाऊ शकतो, असा इशारा दिला. सोबतच त्यावर उपायही सूचविले. कंपनीनेही त्याची हुशारी मान्य करीत 11 लाखांचे बक्षीस दिले आहे.
ओम कालिदास कोठावदे असे या युवकाचे नाव आहे. ॲपल कंपनीचा लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची भीती त्याला जाणवत होती. यामुळे त्याने शोध सुरू केला. चार महिन्यांपासून अमेरिकेतील ॲपल कंपनीच्या संपर्कात येऊन याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. यासह ॲपल कंपनीच्या सहकाऱ्यांशी बोलून लॅपटॉप स्क्रीन बंददरम्यान लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे त्याने पटवून दिले. त्यावर उपाययोजना सुचवल्या, वेळोवेळी हा डेमो स्क्रीन शॉटच्या माध्यमातून व मेसेजिंगच्या माध्यमातून संबंधित कंपनीला केला.
ॲपलनेही मान्य केली त्रुटी
ओमने ॲपल कंपनीच्या निदर्शनास त्रुटी आणून दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तसे करून बघितले. खरेच डाटा चोरीला जात असल्याची भीती त्यांनाही जाणवली. ओमने केलेल्या कार्याचे ॲपलने कौतुक केले व आभार मानले आहेत. या तरुणाला ॲपल कंपनीकडून १३ हजार ५०० डॉलर म्हणजेच जवळपास ११ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आश्रमशाळा पेचरीदेव, ता. अक्कलकुवा येथील मुख्याध्यापक कालिदास विठ्ठल कोठावदे यांचा तो मुलगा असून, त्याचे शिक्षण नंदुरबार येथे झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण तो सध्या पुणे येथे घेत आहे.
ॲपलने पाठविला ई-मेल
ॲपलकडून ओमला ई-मेल पाठविण्यात आला आहे. त्यात आपण पाठवलेला रिपोर्ट क्वॉलिफाई करण्यात आला आहे. यामुळे ॲपलची समस्या सोडण्यास मदत झाली असल्याचे म्हटले आहे. या कार्यासाठी तुम्हाला १३.५ हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत असल्याचे सांगत त्याचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/DrSudhir_Tambe/status/1626848283011448833?s=20
Nandurbar Om Kothawade Got 11 Lakh Prize from Apple