नंदुरबार – नंदुरबारमधील वाळू तपासणी पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याच्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहे. या घटनेतील वादावादीचा व्हिडिओ सुध्दा व्हायरल झाला आहे. या घटनेप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे नगरसेवक गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळू ट्रक अडवून पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे.
या घटनेप्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, नगरसेवक चौधरी यांच्या वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातमधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीची झिरो स्वामीत्व पावती नसल्यामुळे तपासणी पथकाने दोन तास वाळू वाहतुक करणारा ट्रक अडवला. त्यामुळे नगरसेवक चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले. येथे त्यांचा महिला तलाठीबरोबर वाद झाला. यावेळी चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे चौधरी यांनी महिला तलाठी या पाय अडकून खाली पडल्या, आपण कुणालाही मारहाण केली नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आमच्या वाहन चालकांनी तक्रार दिल्याचे सांगितले. दरम्यान या घटनेचे आता पडसाद उमटू लागले असून त्यामुळे राज्यभर या घटनेची चर्चा सुरु झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाळू प्रकरणातील गैरप्रकार समोर आला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!