इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा प्रवेश टोकरतलाव गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतला.
या शाळेत मराठी, आदिवासी, अहिराणी विद्यार्थी आहेत. या त्यांच्या निर्णय़ाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे आपल्या जिल्ह्यातील अधिका-यांची मुले कोणत्या शाळेत आहे यावरही आता चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की,
महाराष्ट्रातील जिल्हा परीषद शाळांमधून कायमच अत्यंत गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची चळवळ सुरू झाल्यास जिल्हा परिषद शाळा निश्चितच आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या होतील, असा मला विश्वास आहे.
एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल वाढलेला असतांना जिल्हाधिकारी सेठी यांनी घेतलेला हा धाडसी निर्णय शासकीय शाळांना बुस्ट ठरणार आहे. आतापर्यंत याच शाळेतून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. तर काही डॅाक्टर, वकील, इंजिनिअर झाले. पण, या शाळांकडे शासनाने दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे इंग्रजी व खासगी शाळांचे पेव फुटले. त्यामुळे या शासकीय शाळांचा दर्जा चांगला असूनही त्याकडे प्रवेश घेण्याचा कल कमी झाला. पण, जिल्हाधिकारी यांनीच हे पाऊल टाकल्यामुळे आता या शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलेल व शाळांचा दर्जाही उंचावेल..