नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता तापी नदी कठावरील गावातील नागरीकांना सतर्कतेचे इशारा देण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी दिली आहे.
तापी नदीवरील हतनूर धरणाचे 30 व्दार पूर्ण क्षमतेने उघडून एकूण 156657 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. तरी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील सांरगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 2 व्दार पूर्ण क्षमतेने उघडून एकूण 37735 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून एकूण 41709 क्युसेक्स इतका विसर्ग आज दुपारी 02.00 वाजता नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.
पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता वरील दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येवू शकतो. तापी नदी काठावरील गावांतील नागरीकांनी नदीपात्रामध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणीही तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये. नदीतील पंप सुरक्षित ठिकाणी स्थळी हलविण्यात यावे. याबाबत नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असेही श्री. खांदे यांनी कळविले आहे.