गोमाई नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुसरी लघु पाटबंधारे योजना नवलपूर ता.शहादा प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 158.25 मीटरची नोंद झाली असुन प्रकल्पात 71 टक्के क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 72 तास धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होणार आहे.
गोमाई नदीकाठावरील टेंभली, लोणखेडा, मलोणी, उंटावट, तिखोरा, शहादा,पिंगाणे, धुरखेडा, मनरद, करझई, डामरखेडा, लांबोळा व इतर गावातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नदी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
रंका नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लघू पाटबंधारे योजना रंकानाला ता.नंदुरबार पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 143.75 मीटरची नोंद झाली असून प्रकल्प 100 पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
रंका नदीनाल्या काठावरील देवपूर, नटावट, लहान मालपूर,भवानीपाडा,धानोरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नदीकाठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
Nandurbar Gomai Ranka River Alert