नंदूरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गांधीधाम-पुरी एक्सप्रेसला नंदूरबार रेल्वे स्थानकाजवळच भीषण आग लागली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. प्रवाशांमध्येही प्रचंड भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गांधीधाम-पुरी एक्सप्रेस नंदूरबार रेल्वे स्थानकावर येत होती. त्याचवेळी या रेल्वेच्या एका कोचला भीषण आग लागल्याचे दिसून आले. आग लागल्याचे वृत्त रेल्वेच्या सर्व कोचमध्ये पसरले. त्यामुळे प्रवेशांमध्ये एकच गोंधळ उडाला. भीतीमुळे प्रवासी आरडाओरड करु लागले. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एकच खळबळ माजली. भडकलेली आग आणि धुराचे लोट यामुळे वातावरण तणाव आणि भीतीपूर्ण झाले. काही प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास झाला. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता रेल्वे थांबल्याने प्रवाशांनी तातडीने रेल्वे बाहेर उड्या टाकल्या. नियंत्रण कक्षाला कळविताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रेल्वे पोलिस, अग्निशमन विभाग आणि रेल्वे प्रशासन यांचे पथक घटनास्थळी आहे. दरम्यान, ही आग जेवण बनविणाऱ्या पॅँट्री कारला लागली होती. पँट्री कारला एक्सप्रेसपासून विलग करण्यात आले आहे. तसेच, सर्व रेल्वे प्रवासी सुखरुप असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1487307218299265024?s=20&t=iwVY1HdXK9QYpjJeWhTsQA