नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हाधिकारी कार्यालय, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यातील स्थानिक बचतगट, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यामार्फत तयार करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण वस्तू व मालाची विक्री केंद्र शासनाच्या ओएनडीसीच्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि प्रोटीन टेक्नोलॉजी, मुंबई यांच्या समवेत आज सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावड़े, सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, मंदार पत्की, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे, ओएनडीसीचे प्रोटीन टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट अंकुश देशपांडे, रॉबिन पांडे आदी उपस्थित होते.
यावेळी ओएनडीसीचे प्रोटीन टेक्नॉलॉजीचे अंकुश देशपांडे आणि रॉबिन पांडे यांनी ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर आणि या प्रोजेक्ट अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या “नंदुरबार ई-मार्केट प्लेस” च्या वापरा संदर्भात सादरीकरण केले. पहिल्या फेरीत 5 विक्रेत्यांची नोंदणी या प्लॅटफॉर्मवर यशस्वीपणे करण्यात आली. आगामी काळात प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 300 उत्पादकांची नोंदणी प्रोटीन टेक्नॉलॉजीमार्फत नंदुरबार ई-स्टोरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ओएनडीसी प्लॅटफॉर्मवर प्रामुख्याने नाबार्ड, माविम, उमेद, कृषी विज्ञान केंद्र, विविध स्वयंसेवी संस्थासोबत जुळलेल्या व वैयक्तिक नाविन्यपूर्ण उत्पादन बनविणाऱ्या उत्पादकांचा समावेश करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी मनीषा खत्री म्हणाल्या की, नंदुरबार जिल्हा हा ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्म वर समर्पित ई-स्टोर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नोंदणी करणारा देशातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. बदलत्या काळात डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचे महत्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील उत्पादकांनी विशेषत: बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ओएनडीसी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या “नंदुरबार ई-मार्केट प्लेस” च्या वापरावर जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन आपल्या उत्पादनाची विक्री करुन आपल्या व्यवसायाची वृद्धी करावी. यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Nandurbar First District of Country MOU