प्रतिनिधी, नाशिक नंदुरबार
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ग्रामस्थांनी राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेपैकी एक म्हणजे स्वविलगीकरण. अनेक गावांनी वेशी बंद करून बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना गावात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. परिणामी रुग्णसंख्येवर ब्रेक लागला आहे.
शहादा तालुक्यातील जवळपास १८० पैकी ७५ गावांमध्ये सध्या एकही सक्रिय कोरोना रुग्ण नाही. विशेष म्हणजे ७५ गावांपैकी ५ गावांमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत एकही कोरोनारुग्ण आढळलेला नाही. ग्रामस्थांनी स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे. म्हणजे गावाच्या वेशींवर बॅरिकेड्स लावून त्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यात कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही, असे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.
शहादा तालुक्यातील कोविड रुग्ण नसलेल्या गावांमध्ये बहिरमपूर, बिलाडी, नवीन अस्लोडा, कलमाड, तिधारे या गावांचा समावेश आहे. नंदुरबार आणि शहाद्यात अनेक कोविड रुग्ण आढळले असले तरीही वरील गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
उर्वरित ७४ गावांमध्ये तुरळक म्हणजेच एकेरी आकड्यात रुग्ण आढळत आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड आणि विभागीय उपायुक्त चेतन गिरासे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामरक्षक दल ग्रामस्थांना कोविडपासून वाचविण्याचे काम करत आहे, असे तहसीलदार कुलकर्णी यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम अक्राणी तालुकाही कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. तालुक्यातील १६५ गावांपैकी १५२ तालुक्यात आतापर्यंत एकही कोरोनारुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती आक्राणी तालुक्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली.