नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील ७५ व शहादा तालुक्यातील ७४ अशा एकूण १४९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार होत आहे. येत्या रविवारी (१८ सप्टेंबर) मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी शनिवार १७ सप्टेंबर रोजी रवाना करण्यात येणार आहे.
त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील ७५ व शहादा तालुक्यातील ७४ निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या स्थानिक संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास १७ व १८ सप्टेंबर या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच निवडणूक क्षेत्रातील मतदार, कामगारांना १८ सप्टेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता दोन तासांची सवलत किंवा सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) तथा नोडल अधिकारी ग्रामपंचायत नितीन सदगीर यांनी निर्गमित केले आहे.
महिला लोकशाही दिन नाही
समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याने सोमवार १९ सप्टेंबर रोजीचा महिला लोकशाही दिन होणार नाही. असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी कळविले आहे.
Nandurbar District School Colleges Holiday