नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कोविड कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात सॅम व मॅम बालकांचे स्क्रिनींगसाठी विशेष मोहिम राबवून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त बालकांचे स्क्रीनिंग केल्याबद्दल नंदुरबार राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला आहे. कोविड कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून 3 हजार 368 सॅम बालकांचे व 18 हजार 668 मॅम बालकांचे स्क्रिनींग केल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्याची सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांचा सत्कार राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री तसेच महिला व बाल विकास मंत्री तसेच राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे होणार आहेत. या सोहळ्यास संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी कळविले आहे.