नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,नंदुरबार व जिल्हा पोलीस विभागामार्फत मागील एका वर्षांत रस्ता सुरक्षेच्या विविध उपाययोजनेला गती देण्यात आल्याने मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी रस्ते अपघातातील मृत्युसंख्या कमी करण्यात यश आले आहे. गत वर्षी जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत जिल्ह्यात रस्ते अपघातात 159 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यावर्षी जानेवारी,2022 ते सप्टेंबर ,2022 या नऊ महिन्याच्या कालावधीत 133 व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यु झाला असून मागील वर्षांच्या तुलनेत मृत्युसंख्या 26 ने कमी झाली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात माहे जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत कार्यालयाच्या इंटरसेप्टर पथकाद्वारे स्पीडगन व कॅमेराचा वापर करुन अतिवेगाने जाणारी वाहने तसेच हेल्मेटचा वापर न करणाऱ्या 3 हजार 216 वाहन चालकाविरुध्द कारवाई करण्यात आली. तर मद्य पिवून वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक करणे, हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे अशा विविध गुन्ह्यांसाठी 167 वाहन चालकांचे ड्रायव्हींग लायसन्स निलंबित करण्यात आल्याने तसेच रस्ता सुरक्षेच्या विविध उपाययोजनामुळे मृत्युसंख्या कमी झाली आहे.
तसेच रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे मार्गदर्शन करणे, कार्यालयात अनुज्ञप्ती चाचणीमध्ये अनुत्तिर्ण झालेल्या उमेदवारांना सिम्युलेटर मशीनवर प्रशिक्षण देणे, तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबीरांमध्ये येणाऱ्या अर्जदारांना वाहतूक चिन्हे व नियमांची माहिती देणे, ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या, ट्रेलर्स व इतर वाहने यांना अपघात टाळण्यासाठी लाल परावर्तीका लावण्याबाबत तसेच रेडियम जॅकेट्सचा वापर करण्याबाबत उपक्रम परिवहन विभागामार्फत हाती घेण्यात आले होते. वायुगेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन चालू आर्थिक वर्षांत 2 कोटी 47 हजार लाख रुपये तडजोड शुल्क व कर वसुल करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे व त्यातील मृत्युचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांची नव्याने पाहणी करण्यात येत असून तेथे आवश्यक उपाय योजना सूचविण्यात येणार आहे.तसेच राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॉमा सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्राची यादी तयार करुन जनतेसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. विविध महामार्गावर काही ठिकाणी रस्ते दुभाजक तोडण्यात येवून तेथून वाहतुक केली जाते अशा ठिकाणांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रस्ते तसेच नगर पालिका हद्दीतील ठिकाणे येथे आवश्यक वाहतुकीची चिन्हे लावण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षितरित्या प्रवास करावा व अपघात कमी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.
Nandurbar District 9 Months Road Accident Death