नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भावाभावांमध्ये अत्यंत प्रेमाचे संबंध असतात, असे आपण रामायण महाभारतात ऐकतो आणि बघतो, राम – लक्ष्मण,असो श्रीकृष्ण – बलराम यांच्या प्रेमाच्या कथा आपल्याला सांगितल्या जातात, पण आधुनिक काळात दोन भाऊ हे दोन सख्ये भाऊ हे पक्के वैरी असतात, असे म्हटले जाते. या संदर्भात अनेक कथा, चित्रपट आणि नाटकांमध्ये देखील अशा घटना दाखविल्या जातात. दोनसख्या भावामध्ये अनेक वेळा शेतीच्या तथा जमिनीच्या वाटणी किंवा अन्य किरकोळ कारणातून मध्ये वादविवाद, भांडणे होऊन एकमेकांचे जीव देखील घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात नुकतीच अशी एक घटना घडली.
धारदार कोयत्याने वार
धडगाव तालुक्यातील कमोद बुद्रुक येथे ही घटना घडली. वडिलोपार्जित शेताच्या बांधावर असलेले सागाचे झाड सामुदायिक असून, त्याच्या हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या लहान भावानेच मोठ्या भावावर धारदार कोयत्याने मानेवर व पाठीवर वार करून जागीच ठार केले. तसेच इतरांनी सोडविण्यासाठी गेलेल्यांनाही मारहाण करून ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन जण जखमी झाले. याबाबत धडगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमोद बुद्रुक (ता. धडगाव) येथे रमेश दादला पावरा (वय ५०) व थिक्या दादला पावरा (वय ४१) या दोघा भावांचे वडिलोपार्जित शेतीतून दोन हिस्से पाडण्यात आले आहे. त्यानुसार दोन्ही हिश्शांच्या शेताच्या बांधावर सागवान झाड आहे. या झाडाच्या हिस्से वाटणीवरून दोन्ही भावंडे व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शेतातच वाद झाला. त्यानंतर घरी आले. मात्र रात्री आठच्या सुमारास पुन्हा दोघा भावांमध्ये वाद सुरू झाला.
कुटुंबीयांचे पलायन
किरकोळ वादात थिक्या पावरा या लहान भावाने व त्याची मुले, पत्नी आणि नातेवाईक यांनी रमेश पावरा यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात थिक्या पावरा याने त्याच्याकडे असलेल्या धारदार कोयत्याने रमेशच्या मानेवर वार केला. त्यानंतर त्याच्या पाठीवर आणि पायावर जोरदार वार केले. त्यात रमेश पावरा गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रमेश पावरा यांचा मुलगा दिनेश पावरा (३६) व नातू अंकेश पावरा (१०) यांनी रमेश पावरा यांना थिक्या पावरा याच्या तावडीतून सोडविण्यासाठी धाव घेतली असता थिक्या पावरा याच्या मुलांनी व पत्नीने त्या दोघांवरही काठीने व सळईने वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. घटनेत रमेश पावरा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच थिक्या पावरा व त्याच्या कुटुंबीयांनी पलायन केले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.