नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याच्या हरणखुरी येथील याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला ‘राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्काराने, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्य हस्ते आज गौरविण्यात आले.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित ‘कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क’ Global Symposium on Farmers’ Rights’ (GSFR) या पहिल्या जागतिक परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीस हा पुरस्कार वर्ष 2020-21 साठी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सविता नाना पावरा आणि मोचडा भामटा पावरा यांनी स्वीकारला. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कार्यरत आहे.
12 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान पहिल्या ‘Global Symposium on Farmers’ Rights’ (GSFR) चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत जगभरातील 59 देशांमधून प्रख्यात शास्त्रज्ञ आणि संसाधन व्यक्ती सहभागी होतील. या सत्रादरम्यान स्थानिक आणि स्थानिक समुदाय आणि जगातील सर्व प्रदेशातील शेतकऱ्यांनी केलेल्या प्रचंड योगदानाची ओळख कशी करावी आणि त्यांना पुरस्कृत कसे करावे या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जातील.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, आणि कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी , कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा , वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ त्रिलोचन मोहापात्रा, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ हिमांशू पाठक (DARE) आदि वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेले, ‘प्लांट अथॉरिटी भवन’ पीपीव्हीएफआर प्राधिकरणाचे कार्यालय, आणि ऑनलाइन वनस्पती विविधता ‘नोंदणी पोर्टल’चे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीचे कार्य
पुरस्कार सोहळ्यानंतर बाएफ संस्थेचे नंदुरबार स्थित प्रकल्प अधिकारी लिलेश चव्हाण यांनी समितीबद्दल माहिती सांगताना, धडगाव तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत 2010 पासून सुरु असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. पुढे सांगताना ते म्हणाले की, लोक सहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन, उत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू झाले. या माध्यमातून मका, ज्वारी, भरड धान्य पिके, कडधान्यांच्या शंभराहून अधिक वाणाचे संवर्धन, अभ्यास आणि लागवड केली जाते.
धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील पंधरा गावांमध्ये मका, ज्वारी, भादी, बर्टी, कडधान्ये, तेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या 108 स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते. हरणखुरी, चोंदवडे गावात दोन सामूहिक बियाणे बॅंकामार्फत मका, ज्वारी, भादी, बर्टी इत्यादी पिकांचे 25 टन बियाणे उत्पादन आणि 170 टन धान्य उत्पादन आणि विक्री करण्यात आली आहे.तसेच ज्वारीच्या जवळ जवळ 19 जाती शोधून काढल्या आहेत. त्यांचे शुध्दीकरणाचे काम केले असून यापैकी पाच जाती पिक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकृत करुन घेण्यात आल्या आहेत.
याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीच्या बीज संवर्धन कार्यामध्ये मोचाडा पावरा, नाना पावरा, सुभाष पावरा, जयसिंग पावरा, जोरदार पावरा, बुरज्या पावरा, बावा पावरा आदी बियाणे संवर्धकांचा सहभाग आहे. या समितीला बाएफ संस्थेतील प्रकल्प अधिकारी लिलेश चव्हाण, विभागीय प्रमुख व्ही. बी. द्यासा आणि मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे आदी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
Nandurbar Committee National plant genome savior community award