नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात बालविवाह रोखण्यास यश आले आहे. यासंदर्भात चाईल्ड लाईन मार्फत अल्पवयीन मुलीचा विवाह नवापूर तालुक्यातील खोलविहीर येथे होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यावर त्वरीत कार्यवाही करुन अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे.
प्राप्त सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, सहायक पोलीस उपनिरीक्षक नयना देवरे, विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, भुषण बैसाणे, यांनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’ तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला.
बाल संरक्षण अधिकारी-संस्थात्मक गौतम वाघ, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य रेणुका मोघे, समुपदेशक गौरव पाटील, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक मेघा पाटील, यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना घटनेचे गांर्भीय लक्षात आणुन दिले. व दोन्ही पक्षातील वधु व वर पक्षाकडील पालकांना विश्वासात घेवून बाल विवाह प्रतिबंध कायद्यातील शिक्षेच्या तरतूदीबाबत माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हिरामण महाले अंगणवाडी सेविका कुसूम ठाकरे यांच्याकडून स्थांनिक बोली भाषेतून बाल विवाह प्रतिबंध कायद्याची माहिती दिली.