नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोषमाळ-कोठार तळोदा रस्त्यालगत चाँदसैली घाटात (कि.मी. ५६/८५० ते ६५/०० लांबी दरम्यान) सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटातील लांबीत गॅबियन व संरक्षक भिंत उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याने २८ जुलै ते २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता वाहतुक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भुस्खलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणावर दगड व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जिवीत हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे सदर मार्गावर धोकादायक वळणावर तसेच आवश्यक त्या ठिकाणी गॅबियन,संरक्षण भिंत करण्यासाठी या मार्गावरील अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतुक बंद राहील.
या मार्गावर काही अनूचित प्रकार घडून अथवा भुस्खलन होवून अपघातात जिवित वा वित्तहानी होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा सार्वजनिक हित लक्षात घेता २८ जुलै २०२३ पासून ते २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत रोषमाळ-कोठार-तळोदा चाँदसैली घाटात मार्गावरील होणारी वाहनांची वाहतूक बंद करून ती इतर मार्गाने वळविणे बाबत आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी जारी केले आहेत.
या मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेच्या रूग्णवाहिका, अग्नीशमक, गॅस सिलेंडर वाहतूक, अन्न व धान्य वितरण या सारख्या वाहनांसाठी वाहतुक सुरू राहिल. या मार्गावर उप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिशा दर्शक फलक आणि बॅरिगेटर्स लावून वाहतुक वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून आवश्यकते नुसार पथकेही नियुक्त करावित. तसेच याठिकाणी जिल्हा पोलीस अधिक्षक आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवतील.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या मार्गावरील रस्त्यांचे दुरूस्तीचे व गॅबियन व संरक्षण भिंतीचे काम मुदतीत करून या मार्गावर ज्या-ज्या ठिकाणी भुस्खलन व अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी दिलेल्या मुदतीत संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्याचेही श्रीमती खत्री यांनी आदेशात नमूद केले आहे.