नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपुडा पर्वताच्या डोंगर- दऱ्यांमध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय जमुनाला नंदुरबारचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उपचारांमुळे नवजीवन मिळाले आहे. आता जमुना पूर्णपणे बरी झाली आहे. या घटनेतून नंदुरबार येथे दुर्मिळ आजारांवर योग्य उपचार होत असल्याचा संदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रतनपाडा येथे जयसिंग वळवी वास्तव्यास आहेत. त्यांना 11 वर्षाची जमुना ही कन्या. ती जिल्हा परिषदेच्या गावातीलच शाळेत शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या पायाला कुठली, तरी टोकदार वस्तू टोचली. त्यातून थोडे रक्त साकळले. जखम मोठी नव्हती. त्यामुळे वळवी कुटुंबीयांनी तिच्यावर घरगुती उपचार केले. मात्र, हेच घरगुती उपचार जमुनाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे टळले आहे.
या घटनेनंतर वळवी कुटुंबीय मुलगी जमुनाला काही झाले आहे, हे विसरले. मात्र, एके दिवशी जमुनाची प्रकृती बिघडली. तिला झटके येण्यास सुरवात झाली. यामुळे वळवी कुटुंबीय घाबरले. त्यांनी तिला तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासले असता जमुनाची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे संदर्भित करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांना जमुनाच्या आरोग्याची माहिती दिली. डॉ. शिंदे यांनी अत्यावश्यक सेवेत असलेले डॉ. प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधून जमुनाच्या आरोग्याची माहिती दिली. जमुना रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉ. पाटील यांनी तपासणी केली. त्यावेळेसही तिला झटके येत होते. एवढेच नव्हे, तर तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिच्या शरीराला ताठरपणा आलेला होता. त्यामुळे डॉक्टरांना ही लक्षणे धनुर्वाताची असल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी औषधोपचार सुरू केले.
धनुर्वात हा क्लोस्ट्रिडिअम टेटानी या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणारा जीवघेणा आजार आहे. त्याचे कण माती, धुळीत असतात. त्याचा संसर्ग जखमेतून होतो. या आजाराने 15 ते 20 टक्के रुग्णांमध्ये मृत्यू होतो. गंजलेल्या लोखंडी वस्तूने इजा झाल्यास किंवा आधीच असलेल्या जखमेवर या बॅक्टेरियाचे कण जमा झाले, तर हा आजार होवू शकतो. मात्र, हा आजार त्यांनाच होतो ज्यांनी धनुर्वातच्या लसीचे डोस घेतलेले नसतात.
डॉ. पाटील यांनी आपले सहकारी डॉ. कृष्णा वळवी, बालरोग कक्ष प्रमुख डॉ. रणजित पावरा यांना बोलावून घेतले. धनुर्वात झालेल्या रुग्णाला उपचारासाठी काळोख असलेल्या कक्षाची आवश्यकता असते. रुग्णाचे अलगीकरण करून त्याला कक्षात ठेवले जाते. तसेच आवाज, ध्वनी प्रदूषण होणार नाही याचीही दक्षता घेतली जाते. तसेच अशा रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यामुळे अतिदक्षता विभागाच्या सुविधा आवश्यक असतात. त्यासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. रिकाम्या खोलीत काळोख करण्यात आला. कमीत कमी आवाज होईल, अशी दक्षता घेण्यात आली. कोविड- 19च्या कालावधीत मिळालेले व्हेंटिलेटर या कक्षात कार्यान्वित करण्यात आले.
जमुनावर औषधोपचारासाठी डॉ. पाटील, डॉ. पावरा, डॉ. वळवी यांच्या नेतृत्वाखाली तीन वैद्यकीय पथके कार्यान्वित करण्यात आली. जमुनावरील उपचारासाठी ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. सुरवातीचे तीन- चार दिवस जमुनाच्या आरोग्याने या पथकांची परीक्षा पाहिली. सिस्टर इनचार्ज सुरेखा वाडिलेही जमुनाची शुश्रुषा करीत होत्या.डॉक्टरांनी सुरू ठेवलेल्या औषधोपचाराचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. अखेर पाचव्या दिवशी झटक्यांचे प्रमाण कमी झाले. जमुना स्वत: श्वासोश्वास घेवू लागली. त्यामुळे ऑक्सिजनची गरज कमी झाली. तिने नळीद्वारे पातळ आहार घेण्यास सुरवात केली. जमुनाच्या शरीराला आलेला ताठरपणा कमी होवून तिचे शरीर पूर्ववत होवू लागले. त्यानंतर ती उठून बसू लागली. त्यानंतर काही दिवसांनी जमुना पावलं सुद्धा टाकू लागली. त्यामुळे नळी काढून भोजन घेवू लागली. सर्व औषधे हळूहळू कमी करण्यात आली. अखेर सात सप्टेंबरला ती पूर्ण पणे बरी होऊन घरी जाण्यासाठी सज्ज झाली. धनुर्वाताशी 25 दिवस जमुनाने संघर्ष केला. या संघर्षाच्या काळात तिला जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाले.
जमुनावरील औषधोपचारासाठी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तिच्यावर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचे सकारात्मक परिणाम पाहावयास मिळाले. नागरिकांनी किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून औषाधोपचार करून घ्यावेत.
डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक,नंदुरबार
Nandrubar Girl Doctor Health Treatment Success Story