नाशिक – भारतीय जैन संघटनेच्या राज्याध्यक्षपदी नंदकिशोर साखला यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आगामी दोन वर्षाच्या कालावधीसाठी आहे. संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी ही नियुक्ती केली आहे. सदरील सभेस राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड चेन्नई, वर्तमान राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब जालना, राज्य सचिव अभय सेठिया व राज्य भरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
साखलाज फ़र्निचर मॉलचे कार्यकारी संचालक नंदकिशोर साखला हे बीजेएसचे संस्थापक सदस्य असून गेल्या ३७ वर्षांपासून विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व आपत्ती व्यवस्थापन कार्यात त्यांचा सहभाग असतो. बीजेएसतर्फे कोविड काळात नंदकिशोर साखला यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे डॉक्टर आपल्या द्वारी, मिशन झिरो अंतर्गत अँटीजेन चाचण्या, मिशन लसीकरण, स्मार्ट हेल्मेट द्वारे तापमान तपासणी, ऑक्सिजन काँसंट्रेटर बँक, कोविड मुळे अनाथ मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
भारतीय जैन संघटनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात तीनशेच्या वर शहरी व ग्रामीण शाखा आहेत. या संघटनेचे भारत भरात एक लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते असून पाचशे पेक्षा जास्त विषय तज्ञ, तांत्रिक व बुद्धीजिवी कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. बीजेएस विशेष करून समाज उत्थान, शैक्षणिक विकास व आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात विविध राज्य सरकारी व केंद्र सरकारी संस्थांच्या बरोबरीने काम करते. विविध सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांवर सखोल अभ्यास करून समस्या निवारणाकरिता विविध विज्ञानाधिष्ठ कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. युवती सक्षमीकरण, मूल्यवर्धन, वधुवर परिचय संमेलन, व्यवसाय विकास मार्गदर्शन, अल्पसंख्यांक योजना लाभ अशा विविध कार्यशाळा द्वारे समाज उत्थानाबरोबर सशक्त राष्ट्र बांधणी करिता बीजेएस कटिबद्ध आहे.
देशातील विविध भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी-अति मागास जिल्ह्यात मुबलक पाणी साठा निर्माण होणेसाठी केंद्र सरकार व निती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली बी जे एस मोठ्या प्रमाणावर देशभरात नदी, नाले, तलाव व धरणातील गाळ उपसून तो आसपासच्या शेतीत पसरविणे व त्या योगे शेतीचा पोत सुधारणे तसेच पाणी साठवण क्षमता वाढविणे व त्याद्वारे एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुजलाम सुफलाम करणे असा अभिनव व बहुउपयोगी कार्यक्रम हाती घेतला आहे. लातूर उस्मानाबाद भूकंप ,कच्छ गुजरात भूकंप तसेच देशभरातील विविध आपत्तीत अनाथ झालेल्या मुलांचे, मेळघाट मधील कुपोषित बालकांचे तसेच महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन बीजेस च्या वतीने मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले आहे. या निवडीबद्दल नंदकिशोर साखला यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे