इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नंदीची मूर्ती पाणी, दुध पीत असल्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, अशा प्रकारच्या पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करणे हे तुम्हाला महागात पडू शकते. कारण, राज्यामध्ये जादुटोणा विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यान्वये अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येतो.
यासंदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे (मो. 9890578583) म्हणाले की, दगडाची मूर्ती ही पाणी, दूध पीत नाही. ते पाणी किंवा दुध मूर्तीवरून खाली उतरत आहे. मूर्तीच्या खालील भाग ओला झाल्याचा तो प्रत्यक्ष पुरावा आहे. चमत्कार होतात यावर श्रद्धा ठेवणारे लोक स्वतःच स्वतःची यातून मानसिक फसवणूक करत आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. तथाकथित चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती, लोकांना फसवणे , ठगवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे हा जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. चमत्कार सिद्ध करा (लेखी आव्हान प्रक्रिया पूर्ण करून) आणि 25 लाख रुपये मिळवा, हे आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सतत देत आली आहे. ज्यांना वाटतं की नंदीची मूर्ती ही पाणी किंवा दूध पिते आहे, त्यांनी हे आव्हान स्वीकारावे. व्हिडिओ व्हायरल करून समाजाची दिशाभूल करू नये. जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. संतांनी चमत्कार होत नाही हे आपल्या अभंगांमधून सांगितले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चमत्काराच्या संदर्भात दिलेली वैचारिक शिकवण आपण समजून घेतली पाहिजे. ते म्हणतात …
” *चमत्काराच्या भरी भरोनि । झाली अनेकांची धुळधाणी ।*
*संत – चमत्कार यापुढे कोणी । नका वर्णू , सज्जन हो ! ॥ 50॥*”
” *वास्तविक संत नव्हे जादुगार । करावया चमत्कार।*
*हा तो चालत आहे व्यवहार। पोटभ-यांचा ॥ 68॥* ”
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (ग्रामगीता – अ. 31)
नंदीची मूर्ती ही पाणी किंवा दुध पिते हा चमत्कार नाही. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. याला विरोध करत, सदर मॅसेज सर्वत्र वायरल करत संतांचे विचार व वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवत, अंधश्रध्दा मुक्त समाजाच्या निर्मिती प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन वंजारे यांनी केले आहे.