नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ‘महिला वर्गाने कुणाच्याही दादागिरी, गुंडगिरी आणि दडपशाहीला बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा. याचसाठी समीर भुजबळ यांची उमेदवारी आहे. आपले भाऊ आपल्यासाठीच येथे आले आहेत. त्यामुळे तुम्ही निर्भयपणे आणि निश्चिंत रहा. येणारा काळ आपलाच आहे’, असे सांगत लक्ष्मीबाई गायकवाड यांनी माघार घेत समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, ‘नांदगाव तालुक्याचा विकास घडविण्यासाठीच समीर भुजबळ यांना उमेदवारीचा आग्रह करण्यात आला. त्यांनी तो मान्यही केला. सर्वसामान्य माणूस किती दहशतीखाली वावरतो आहे, अनेकांना तर धाक दडपशा दाखविला जात आहे. मात्र, भुजबळ निवडून आले तरच आपल्यासाठी सुरक्षित काळ येईल. म्हणूनच आपण सर्वांनी भुजबळ यांना मत देण्यासाठी मतदानयंत्रावरील शिट्टी या निशाणीवरील बटण दाबावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
गायकवाड यांनी स्पष्ट केले की, दहशतमुक्त नांदगावसाठी मी उमेदवारी मागे घेत समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. नांदगाव तालुक्याला प्रगत बनवायचे असेल तर भुजबळ यांच्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे. अनुभवी, हुशार, सर्वगुणसंपन्न असे त्यांचे नेतृत्व आहे. आपल्यासाठीच ते लढायला तयार झाले आहेत. याची जाणिव आपण ठेवायला हवी, असेही त्या म्हणाल्या.