नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विकासाची मूलभूत हक्क देण्यासाठी तसेच गेल्या पाच वर्षाच्या कालावधी येथील लोकप्रतिनिधीने निर्माण केलेली जनतेवरील दहशत दडपशाही संपवण्यासाठी आपण उमेदवारी करत आहे. त्यासाठी आशीर्वाद द्यावे असे आवाहन नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी भव्य रॅलीद्वारे आज भयमुक्त नांदगाव प्रगत नांदगावसाठी नांदगाव येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नांदगाव शहरात जैन धर्मशाळा येथे भव्य सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शेखर पगार, विजय पाटील, अरुण पाटील, अमित पाटील, दिपक गोगड, रतन हलवर, राजाभाऊ खेमनार, दिपक साळवे, संतोष आहेर, संजय निकम, रवींद्र घोडेस्वार, बंडू पगार, कैलास पाटील, बाळासाहेब हिंगे, रामू नहार, विनोद शेलार, अपर्णा देशमुख, संगीता सोनवणे, अमित नाहर, गोरख जाधव, कैलास बर्डे, संपत पवार, यांच्यासह भयमुक्त नांदगाव – प्रगत नांदगाव समन्वय समितीचे सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
आज दिवाळीचा पहिला दिवस असून ही दिवाळी सुखा समाधानाची जावी. तसेच यंदाच्या दिवाळीत नांदगाव शहर भयमुक्त आणि प्रगत नांदगावचा संकल्प करूया असे सांगत समीर भुजबळ म्हणाले की, नांदगाव भयमुक्त करण्यासाठी तसेच मतदार संघाचा खुंटलेला विकास करण्यासाठी उमेदवार बदला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी द्या अशी मागणी येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र ही जागा त्यांनाच मिळाल्याने अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आज भर सभेत शेखर पगार यांना धमकी येतेय इतकी दहशत या मतदारसंघात निर्माण झाली आहे. अगदी आम्हालाही कुणी भेटायला आलं किंवा आम्ही कुणाला भेटायला गेली की त्यांना लगेच धमकी दिली जाते. ही या मतदारसंघातील दहशत संपविण्यासाठी आपण येथे आलो आहे. वास्तविक मतदारसंघात विकासाची गंगा आणायला हवी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शासनाने अनेक योजना आणल्या. मात्र त्या योजना या मतदारसंघात राबविल्याचे कुठेही दिसत नाही.
ते म्हणाले की, नांदगाव मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणी नाही, मनमाड मध्ये पाणी नाही, मतदारसंघात शेती सिंचनासाठी व्यवस्था नाही. आरोग्याची दुरवस्था झाली आहे शिक्षणासाठी सुविधा नाही. आरोग्याच्या सुविधा नाही व्यवसाय उद्योगासाठी रोजगारासाठी सुविधा नाही. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा नाही असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आज आहे. या मतदारसंघात जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे. सर्व वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की आम्ही विकासाच राजकारण करतो. आमदार पंकज भुजबळ यांनी दहा वर्ष या मतदारसंघाचा नेतृत्व करून अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे केली. आदरणीय भुजबळ साहेबांनी येवला मतदार संघाचा कायापालट केला. नाशिक मध्ये खासदार असताना अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकार करून नाशिकच्या विकासात अधिक भर घातली. मात्र कधी कुणाला त्रास दिला नाही आम्ही तोडायचे मोडायचे राजकारण केले नाही तर जोडायचे राजकारण केलं असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की विकास हा मूलभूत हक्क जनतेला मिळायला हवा यासाठी आपण काम करतो आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आदर्श विचार बघून आपण काम केलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत संसदेत काम केलं. कोणी कुठल्याही पक्षात असला तरी विकासासाठी आम्ही नेहमीच प्राधान्य दिलं. आज मात्र या मतदारसंघात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे हे आम्ही होऊ देणार नाही. हे शक्य नाही हे थांबवायचा आहे हे आपल्या आशीर्वादानेच थांबणार आहे त्यासाठी आपण आशीर्वाद द्यावे असे आवाहन करत ‘मेरा इरादा सियासात का रुख बदलेगा, तू याद रख मेरा ये हौसला तेरा गुरुर तोडेगा” या शायरीतून विरोधकांना टोला लगावला.
यावेळी विजय पाटील म्हणाले की, नांदगाव विधानसभा मतदारसंघात गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याची गरज आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांच्या माध्यमातून आपल्याला मतदारसंघात परिवर्तन करायचे आहे. अठरापगड जाती धर्मातील लोकांना लोकशाही मार्गाने पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शेखर पगार म्हणाले की, यांनी नांदगांव भयमुक्त करायचे असेल, टक्केवारी मुक्त करायचे असेल व लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर समीर भुजबळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी पाटील, दिपक गोगड, राजाभाऊ खेमनार, दिपक साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.
भव्य रॅलीतून भयमुक्त नांदगाव प्रगत नांदगावचा निर्धार
अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नांदगाव शहरात जैन धर्मशाळा मालेगाव रोड येथून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली शिवाजी चौक, कालिका चौक महात्मा फुले चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुनी पालिका, अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे पुन्हा जैन धर्म शाळेजवळ येऊन तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. वाजत गाजत निघालेल्या या रॅली आनंद उत्सव साजरा करत सहभाग नोंदविला. यावेळी मोटार सायल रॅली द्वारे युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली दरम्यान भयमुक्त नांदगाव – प्रगत नांदगांव चे फलक नागरिकांनी झळकावले. रॅली दरम्यान जागोजागी समीर भुजबळ यांचे महिलांनी औक्षण केले.यावेळी नांदगांव भयमुक्त झालच पाहिजे अशा घोषणांनी नांदगाव नगरी दणाणून निघाली.