अजय सोनवणे
नांदगाव– नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील गंगाधरी व पोखरी ( ता.नांदगाव ) येथील म्हसोबा बारीच्या मागील डोंगरावर काल संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत सुमारे पाच ते दहा हेक्टरवरील गवत व वृक्ष जळून खाक झाले. मागील १५ वर्षांपासून गोरख जाधव कुटुंबीय व गंगाधरी ग्रामस्थ यांनी अपार कष्ट घेत या क्षेत्रात झाडे जगवली होती. अवघ्या काही तासांत आगीच्या भक्षस्थानी ही सर्व झाडे आली. झाडांच्या फांद्या तोडून तसेच खाजगी टँकरद्वारे पाणी टाकून आग विझण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आग विझेपर्यंत सुमारे पाच ते दहा हेक्टरवरील पळस, कडु निंब ,काशीद, सिसव ,बांबू ,बोर, बाभळी आदी शेकडो झाडे जळून खाक झाली. रखरखत्या उन्हात आगीचे चटके सोसत ही आग विझवण्यात आली. दरम्यान, आग कशी लागली याबाबत मात्र कळू शकले नाही..