नांदगाव – नवरात्री निमित्तानं ग्रामदेवता एकविरा मातेच्या मंदीरात जाणारी पंचवीस वर्षीय विवाहिता रेल्वेगाडी सापडून ठार झाली. येथील मध्य रेल्वेच्या सबवेत पाणी साचल्यामुळे ही महिलेने रुळ ओलांडत असतांना ही घटना घडली. नांदगाव शहरात गेल्या काही दिवसापासून झालेल्या पावसामुळे सबवेमध्ये पाणी तुंबले आहे. त्यामुळे नांदगावमध्ये अगोदरच या सबवे बाबत संताप असतांना ही घटना घडली.
रविवारी पहाटे सहा वाजता ही घटना घडली. स्वाती रवी शिंदे (२५) ही महिला शेजारी राहणाऱ्या सुवर्णा मोरे या महिलेसह तीघा मुलींना सोबत घेवून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. पण, भुसावळकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसखाली ती सापडली. सुदैवाने सुवर्णा व अन्य तीघे मुली मात्र बचावल्या. ही घटना होत असतांना नगरसेवक नितीन जाधव हेही मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. त्यांच्या समोरच हा अपघात झाला. त्यांनी आरडाओरड रुळ ओलांडून जाणाऱ्या या महिलांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वाती शिंदे या महिलेला वाचविता आले नाही. ही घटना झाल्यानंतर मुली महिलांचा आक्रोश काळीज हेलावून टाकणारा होता. नितीन जाधव यांनी भयभयीत झालेल्या मुलींना धीर दिला. व त्यांच्या कडून मिळालेल्या फोनक्रमांकावर फोन केला असता या महिला रेल्वे वसाहतीमागील नव्या वस्तीत राहणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले
या घटनेबाबत नगरसेवक .नितीन जाधव यांनी सांगितले की, आज सकाळी नागपूरने मुंबईला जाण्यासाठी निघालो असता अत्यंत दुर्दैवी अशी घटना माझ्या समोर घडली. सुमारे साडेपाच वाजता लक्ष्मी टॉकीज जवळील पुल ओलांडून पुढे जाता जाता मुंबई वरून येणाऱ्या गाडीला सिग्नल होता आणि माझ्या बाजूने देखील मालगाडी जात होती. मी पुढे गेलो आणि गाडी संपली तितक्यात मुंबई वरून गाडी पुलापर्यंत आली लहान तीन मुले घेऊन दोन बायका घाईत निघतांना दिसल्या. मी जोरात ओरडलो. पण, तो पर्यंत दुर्लक्ष करून रुळ ओलांडला. सर्वांनी घाबरून रुळ ओलांडला. पण शेवट असलेली महिला गाडीखाली खेचल्या गेली. गाडी गेल्यानंतर पाहिले तर ती क्षणात जीव सोडून गेलेली होती. सर्वांचा आई आई म्हणून आरडा ओरड झाला. त्यांना शांत करून त्यांच्या कडून मोबाईल नंबर घेतला. फोन करून सांगितलं तेव्हा समजले की आपल्याच भागात राहणारा गरीब होतकरू राजू शिंदेची ती पत्नी होती. तो येई पर्यंत तिथेच थांबलो तो आल्या नंतर एकच टाहो फुटला. मला त्यांना सावरणे कठीण झाले. रेल्वे सबवे मध्ये पाणी नसते तर ती महिला आज जिवंत असती…