गौतम संचेती, नाशिक
नांदगाव विधानसभा मतदार संघात सर्वात चर्चेचे नाव आता डॅा. रोहन बोरसे यांचे ठरले आहे. जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ व वैद्यकिय अधिकारी असलेले डॅा. रोहन बोरसे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे राजीनामा दिल्यानंतर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले व अवघ्या काही दिवसात त्यांनी सर्व मतदार संघ पिंजून काढला. विशेष म्हणजे त्यांचे मतदार संघात विविध ठिकाणी सत्कार होत असून त्यांना निवडणुकीसाठी निधीही दिला जात आहे.
डॅा. बोरसे हे २०१८ ते २०२२ या दरम्यान नांदगाव आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी होते. या कोरोना काळात त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांनी केलेली रुग्णसेवा अनेकांच्या आजही लक्षात आहे. त्यामुळे त्यांची देवदूत अशी प्रतिमा तयार झाली आहे.
नांदगाव तालुक्यातील साकोरा या गावातील रहिवासी असलेले डॅा. बोरसे हे मराठा समाजाचे आहे. नांदगाव मतदार संघात चर्चेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, अपक्ष माजी खासदार समीर भुजबळ व ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक हे तिन्ही उमेदवार हे ओबीसी समाजाचे आहे. त्यामुळे येथे मराठा समाजाचा सक्षम उमेदवार असावा अशी मागणी होती. त्यामुळे त्यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पण, आता सर्वच उमेदवारांना त्यांची धडकी भरली आहे. सव्वा लाखाच्या आसपास मराठा समाजाची मते असल्यामुळे त्याच्यातील ९० टक्के मते त्यांच्या पारड्यात जाईल असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. त्यांना मराठा समाजाबरोबरच इतर समाजाची मतेही त्यांच्या कामामुळे पडतील अशीही चर्चा आहे.
राजीनामा मंजूरीसाठी थेट न्यायालयात
डॅा. बोरसे यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी पक्षही सावध झाले. त्यांनी हा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केले. अगोदर जिल्हा स्तरावर त्यांचा मंजुरी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पण, ग्रामस्थांच्या दबावानंतर तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर मंत्रालयातून तो मंजूर झाला नाही. शेवटी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सुनावणी झाली. त्यानंतर राज्य सरकारने राजीनामा मंजूर करीत असल्याचे लेखी आदेश काढले व नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डॅा. रोहन बोरसे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर छाननीत तो वैध ठरला आहे.
असे आहे समीकरण
नांदगाव विधानसभा मतदार संघात गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचा आमदार झालेला आहे. त्यात दोन वेळेस पंकज भुजबळ व आता विद्यमान आमदार सुहास कांदे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ही संधी मराठा समाजाला मिळावी अशी भावना येथे प्रबळ आहे. या मतदार संघात सर्वात जास्त मते ही मराठा समाजाची आहे. त्या खालोखाल वंजारी, धनगर, माळी, अनुसूचित जाती, जमाती, बौध्द, मुस्लिम मते आहेत. सध्या राज्यभर मराठा आंदोलनामुळे मराठा समाज जागृत झालेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने डॅा. रोहन बोरसे यांच्या पारड्यात जास्त मते टाकली तर येथील समीकरण बदलणार आहे. डॅा.बोरसे यांच्या प्रतिमेमुळे त्यांना इतर समाजाची मते पडू शकतात. त्यामुळे डॅा. रोहन बोरसे यांचे नाव आता जास्त चर्चेत आले असून इतर उमेदवारांना धडकी भरली आहे.