नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यात विकासाची जी कामे भुजबळ कुटुंबीयांनी केली आहे. ती कामे ‘विकासाचा भुजबळ पॅटर्न’ म्हणून जनतेत रूढ झाली आहेत. आगामी काळात नांदगाव मतदारसंघातील नागरिकांच्या आशीर्वादाने नांदगाव भयमुक्त करूच तसेच सर्व नागरिकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा परिपूर्ण विकास करू, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी केले. नांदगाव-मनमाड-मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नस्तनपूर देवस्थान येथे शनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत समीर भुजबळ यांनी नारळ वाढवून आज प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर जगन पाटील, मविप्रचे संचालक अमित पाटील, रतन हलवर, भगवान सोनवणे, राजेंद्र आहेर, प्रताप गरुड, विजय पाटील, प्रसाद सोनवणे, विनोद शेलार, कपिल तेलोरे, फैजल शेख, दिनकर पाटील, जयश्री शिंदे, यांच्यासह विविध समाजातील नेते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सभेच्या सुरुवातीला नांदगावहून मोटरसायकलची प्रचंड रॅली नस्तनपूर पर्यंत काढण्यात अली. त्यांनतर नस्तनपूरच्या प्रांगणात विराट सभा संपन्न झाली. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले की, नांदगाव तालुक्यात शनी मंदिर हे अति प्राचीन देवस्थान असून या देवस्थानचा पर्यटनाच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांनी विकास केला आहे. आज या देवस्थान परिसराचा कायापालट केल्यानंतर लोकांमध्ये भुजबळ म्हणजे विकास हाच पॅटर्न रूढ झाला आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघातील जनता ही मतदारसंघाला भयमुक्त करून प्रगत नांदगावसाठी आपल्या पाठिशी राहील असा आपल्याला विश्वास आहे. आगामी काळात युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, मजूर, शेतकरी वर्ग या सर्व समाजघटकांना सोबत घेऊन मतदारसंघात विकासाची कामे करू, असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
समीर भुजबळ पुढे म्हणाले की, नांदगाव तालुक्यात जे भयाचे वातावरण सुरू आहे, ते आता दूर होणार आहे. मतदारसंघातील नागरिकांनी कुठल्याही दबावाला किंवा भीतीला बळी पडू नये. सर्वांनी निर्भय बनून मतदानाला बाहेर पडावे. या निवडणुकीनंतर अनेक विकासाची कामे या भागात सुरू होणार आहेत. आमदार पंकज भुजबळ यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतांना अनेक विकास कामांची बीजे रोवली आहेत. नांदगाव प्रशाकीय संकुल,विविध बंधारे, शाळा, रस्ते, पूल, आदिवासी वस्त्यांचा विकास यासह अनेक योजना राबविल्या आहेत. मतदारसंघात जो आज विकास दिसत आहे तो विकासाचा भुजबळ पॅटर्नच आहे. येवला मतदारसंघाला जलसंजीवनी देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण केला आहे. या प्रकल्पाचे पाणी आज मतदारसंघात सर्वदूर पसरले आहे. आगामी काळात पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून येवला नांदगावसह अवर्षणग्रस्त भागाला हे पाणी आपण उपलब्ध करून देऊ, असा विश्वास समीर भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच नांदगावच्या भविष्यासाठी दि.२० नोव्हेंबर रोजी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ९ समोरील शिट्टी या निशाणीवरील बटण दाबून मला आशीर्वाद द्यावे, असे विनम्र आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
यावेळी विजय पाटील म्हणाले की, नस्तनपूर येथील सभेला हा जो सर्व समाजातील वर्ग उपस्थित आहे तो प्रतीसास बघता समीर भुजबळ यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. मविप्रचे संचालक अमित पाटील म्हणाले की, आज नस्तनपूर परिसराचा झालेला कायपालट हा समीर भुजबळांच्या विकासाची कल्पकता आहे आम्हाला विश्वास आहे की ते विकास कामे राबवताना कुठेही कमी पडणार नाही कारण ते भुजबळ आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी जगन पाटील म्हणाले की, दूरदृष्टी कशी असते ते शनीचरणी नतमस्तक झाल्यावरच कळते. शनी मंदिरच्या विकासासाठी भुजबळ साहेबांनी माजी आमदार अनिल आहेर व आम्हाला बोलवून घेतले होते. त्यावेळी शनी मंदिरच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून किती निधी पाहिजे अशी विचारणा साहेबांनी केल्यावर माजी आमदार अनिल आहेर यांनी अगदी घाबरत घाबरत दोन-चार कोटी द्या, असे सांगितले. मात्र विकासाची कल्पना आणि तेथे काय काय विकसित करता येईल याचा सगळा अभ्यास करून तब्बल १४ कोटींचा निधी शनी मंदिराच्या विकासासाठी दिला. आणि आज ही जी वास्तू निर्माण झाली आहे. ही सगळी भुजबळांची किमया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भगवान सोनवणे म्हणाले की, अपक्षांची ताकद काय असते ती येथे आल्यावर कळते आता ही लढाई नेत्यांची राहिली नसून जनतेने ही लढाई हातात घेतली आहे. समीर भुजबळ येथे आले ते देवदूत म्हणूनच. विकासाचे दुसरे नाव म्हणजेच भुजबळ ती संकल्पना या पुढच्या काळात निश्चित राबवली जाईल असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब बोरकर म्हणाले की, नांदगावला लोकशाही राहिली नाही गुंडगिरी यांचे साम्राज्य तयार झाला आहे आणि साम्राज्य उध्वस्त करायला तुम्हा सगळ्यांचा एक एक मत महत्त्वाचा आहे ते मत समीर भुजबळ यांना देऊन विजयी करा आणी तुम्हाला हे सगळं नांदगावच साम्राज्य राखायचा आहे. नांदगावकरांना आपल्या सगळ्यांना सांभाळून विकास कामांची बिजारोपण पुढच्या काळात समीर भुजबळांच्या माध्यमातून करायचे आहे. आताचा आमदार पत्र्याचा आमदार आहे अशा पत्री आमदाराला येथून हुसकून लावल्याशिवाय विकासाचे मोठे प्रकल्प येथे सुरू होऊ शकणार नाही त्याचा पराभव निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
आरपीआय नेते म्हणाले की, कपिल तेलोरे मी गेले अनेक दिवस विद्यमान आमदार बरोबर काम केले मात्र आंबेडकरी चळवळीतील येथील लोकांना या आमदाराने या समाजाला काहीच दिले नाही उलट त्यांची निराशा केली. मात्र भुजबळ साहेबांनी येवला असो की नाशिक असो तेथे आंबेडकरी समाजाच्या विकासासाठी अनेक कामे केली त्या कामाने प्रभावित होऊन मी समीर भुजबळांसोबत आलो आहे आणि माझ्यासोबत सर्व समाजाचा समीर भुजबळ यांना पाठिंबा आहे आपण सर्वांनी त्यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
जाहीर पाठिंबा
‘भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव’साठी शिवसेना उबाठा गटाचे नेते मच्छिंद्र सातपुते, दिनकर काळे,अशोक लहिरे या सर्वांनी समीर भुजबळ यांना जाहीर पाठिंबा दिला. विकासासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आपणही सर्वांनीही भुजबळ यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.