नांदगाव (इंडिाय दर्पण वृत्तसेवा)- नांदगाव विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष बाळु उर्फ बाळासाहेब राजाराम बोरकर यांना माघार घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नांदगाव तालुकाध्यक्ष साईनाथ नामदेव गिडगे यांनी धमकी दिली. याप्रकरणी बोरकर यांनी नांदगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत रविवार ३ नोव्हेंबर २०२४ रोजी १.०६ वाजता मला फोनवरुन धमकी दिली. त्याचे कॅाल रेकॅाड्रिंग सुध्दा माझ्याकडे असल्याचे म्हटले आहे. या धमकीमुळे मला माघार घ्यावी लागल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेप्रकरणी त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली, मी नांदगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवारी अर्ज भरल होता. पण, शिवसेना शिंदे गटाचा नांदगाव तालुकाध्यक्ष साईनाथ नामदेव गिडगे यांनी धमकी दिल्यामुळे मला माघार घ्यावी लागली. मला साईनाथ गिडगे आमदार सुहास कांदे यांचे नाव घेऊन वारंवार जीवे मारण्याची धमकी देत आला आहे. रविवार ३ नोव्हेंबर २०२४ रोजी १.०६ वाजता मला फोनवरुन धमकी दिली. त्याचे कॅाल रेकॅार्डिंग सुध्दा माझ्याकडे आहे. या धमकीमुळे मला माघार घ्यावी लागली.
मी वंचित बहुजन आघाडीचा तालुकाध्यक्ष होतो. मला नांदगाव विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे मी राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, गिडगे यांच्या धमक्यामुळे मला राजकारणातून बाहेर पडावे लागले. माघारीनंतर माझ्यावर प्रचंड दबाव आहे. मला व माझ्या कुटुंबियाला गिडगे पासून जीवाला धोका आहे. त्यामुळे काही विचित्र घडल्यास किंवा घातपात झाल्यास त्याला साईनाथ गिडगे व त्याच्या बरोबरचे साथीदार जबाबदार राहतील. ते खोटेनाटे आरोप करुन गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराचा दखल निवडणूक प्रशासन व पोलिस प्रशासनाने घ्यावी.
नांदगाव विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे ही निवडणूक भयमुक्त व्हावी यासाठी मी जाहीरपणे गुंडशाही व झुंडशाही विरुध्द भूमिका घेतली आहे. या धमकी विरुध्द मी नांदगाव पोलिस स्टेशन येथे साईनाथ गिडगे यांच्या विरुध्द तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.