अजय सोनवणे, मनमाड
भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या १० मोरांचा नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील आमोदे शिवारात मृत्यू झाला आहे. साधारण अडीच वर्षे वय असलेल्या ४ नर आणि ६ मादी जातीच्या मोरांचा त्यात समावेश आहे. आमोदे गावच्या सतारी शिवारात सकाळी मृत्युमुखी पडलेले हे मोर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विखुरलेले सर्व मोर एकत्रित करत त्यांचा पंचनामा केला, दरम्यान मोरांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी विषबाधा झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, वनविभाग व वैद्यकीय पथकाकडून मृत्यू झालेल्या मोरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, एकाच वेळी दहा मोरांचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमिंकडून हळहळ व्यक्त होत आहे.