नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील गिरणा नगर उड्डाणपुलाजवळ आज मोठा अपघात घडला. गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक चार मोटारसायकल आणि एका फळविक्रेत्याला जोरदार धडक दिली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. तसेच, पळापळ सुरू झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या ट्रकने ४ मोटरसायकल व एका फळ विक्रेत्या लोटगाडीला जोरदाक धडक दिली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने मोटरसायकल स्वारांनी जीव मुठीत घेऊन धूम ठोकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर ट्रक चालक जखमी झाला आहे. त्यास स्थानिक नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मनमाड जवळच्या पानेवाडी येथिल बॉटलिंग प्लांट मधून गॅस सिलेंडर भरुन हा ट्रक कासोदा येथे जात होता. त्याचवेळी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.