नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वन जमिनी कसणाऱ्या आदिवासींवर सुरू केलेली दडपशाही थांबवावी, पेरणी सुरू असतांना ट्रॅक्टर, बैल आदी जमा करण्याचे प्रकार थांबवावे या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भर पावसात नाशिकच्या नांदगाव येथील वन परिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर नांदगाव – मनमाड रस्त्यावर रास्ता – रोको आंदोलन केले..
रास्ता रोको करतांना तब्बल दोन ते अडीच तास कार्यालयावरच ठिय्या आंदोलन पुकारले. प्रांताधिकारी, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस अधिकारी आदींनी आंदोलकांशी चर्चा करत यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, वनजमिन दावे दाखल आहेत, त्या अतिक्रमण धारकांना वनविभागाने जमीन कसू द्यावी. वन जमिनी कसणाऱ्यांना त्रास देवू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.