नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बचत गटाच्या महिलांच्या मनातील अनेक प्रश्नांना आज प्रथमच मनमोकळ्यापणे उत्तरे मिळाली.त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर प्रथमच मोठे हास्य फुलले. निमित्त होते देवघट आणि निमगाव येथे महिला बचत गट मेळाव्याचे.
अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ या विशेष महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अभिनेत्री अनुष्का सरकटे, डॉ. शेफाली भुजबळ, माजी नगरसेविका सुनीता निमसे, योगिता आहेर, अभिलाषा रोकडे आदींनी मार्गदर्शन केले.मेळाव्यास शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरण, कायमस्वरूपी रोजगार, शेतीपूरक उद्योग-व्यवसाय कसे सुरू करता येईल, बचत गटांचा आर्थिक विकास कसा करता येईल, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कसे प्रयत्न करता येतील, पाण्याची समस्या कशी सोडवता येईल आदींबाबत मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. कळवाडी गटातील देवघट येथील वैजनाथ महादेव मंदिर तर निमगाव गटातील निमगाव येथील मोतीमहल मंगल कार्यालय येथे हे मेळावे झाले. याप्रसंगी महिलांनी त्यांच्या शंका मान्यवरांना विचारल्या. त्याचे निरसन झाले. त्यामुळे या महिला अतिशय आनंदात दिसत होत्या.
यावेळी डॉ.भुजबळ म्हणाल्या की,नाशिकमध्ये भुजबळ फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना आपण मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी महिला बचत गट प्रगती करत नाहीत. मात्र, आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठिशी उभे राहून तुम्हाला हवी ती मदत करु. गटांच्या वस्तू, पदार्थ तसेच उत्पादनांना चांगले व्यासपीठ निर्माण करुन देऊ.उत्पादनासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा,क्लस्टर सुद्धा उपलब्ध करुन देऊ. त्यासाठी माजी खासदार तथा अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना विजयी करावे,असे आवाहन त्यांनी केले.
अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाल्या की, ग्रामीण महिला कष्टाळू आहेत. त्यांच्या कला, कौशल्याला वाव मिळाला पाहिजे. त्यासाठी बचत गट सर्वोत्तम व्यासपीठ आहे. महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते. माजी खासदार समीर भुजबळ यांना विकासाचे व्हिजन आहे. ते आपल्या सर्वांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन देतील. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या शिट्टी या निशाणीवर मत द्यावे, असे आवाहन सरकटे यांनी केले.