नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 113- नांदगाव विधानसभा मतदारसंघात आज मतदानाच्या वेळेस दिवसभर घडलेल्या घटनांप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
नांदगाव शहरात गुरुकृपा महाविद्यालयाजवळ आज सकाळी काही मतदारांची एकाच ठिकाणी गर्दी झाली होती. यावरून दोन उमेदवारांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येत आहे. तसेच बाहेरील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
साकोरे गावात घडलेल्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येत आहे. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिस बळाचा सौम्य वापर करण्यात आला आहे. नांदगाव मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. नांदगाव मतदारसंघातील घटनांवर जिल्हा प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. तसे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिला आहे.